दिशा सालियन प्रकरणातही
अशीच भूमिका घ्यायची का?
खासदार नरेश म्हस्केंचा सवाल; दुःखावर राजकारण नको
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ : दिशा सालियन प्रकरणाच्या एफआयआरमध्ये उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्यासह अनेकांची नावे आहेत. मग दोन प्रकरणांमध्ये वेगवेगळे न्याय का? मीनाक्षी शिंदेंनी अटक व्हावी, असे म्हणत असाल, तर दिशा सालियन प्रकरणात ज्यांची नावे आहेत, त्यांच्याबाबतही अशीच भूमिका घ्यायची का? असा सवाल शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी उपस्थित केला. तसेच पूर्णेकर कुटुंबाच्या दुःखावर राजकारण करू नका. ठाण्यात आपल्यासोबत जनता का नाही, याचे आधी आत्मपरीक्षण करा, असा टोला लगावला.
शिवसेना (ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. खासदार म्हस्के यांनी शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार पलटवार केला. दिशा सालियन प्रकरणात सीबीआयच्या सध्याच्या एफआयआरमध्ये नावे असणे म्हणजे संबंधित व्यक्तींना आरोपी ठरविण्यात आले आहे, असे नाही. सीबीआयने या व्यक्तींच्या भूमिकेची चौकशी करण्याचे नमूद केले आहे. मिठी नदी प्रकरणाचा उल्लेख करत म्हस्के यांनी कंत्राट कसे आणि कोणी दिले, हे सर्वांना माहीत आहे, असा दावा म्हस्के यांनी केला. तसेच दिशा सालियान प्रकरण आणि दिनो मोरिया यांचा उल्लेख करत म्हस्के यांनी ठाकरे गटावर टीका केली. मिठी नदी प्रकरणात दिनो मोरिया याला अटक करण्यात आली. त्यामुळे एखाद्याला अटक झाली म्हणून आता इतरांनाही अटक करा, असे म्हणायचे का, असा टोला त्यांनी लगावला.
पूर्णेकर यांची हत्या ही अत्यंत दुःखद घटना आहे. याचा आधार घेऊन ठाकरे गटाचे नेते आपल्या पक्षाचे अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. ठाण्यात कोणताही गुन्हा घडला की त्याचे खापर एकनाथ शिंदे यांच्यावर फोडले जाते. ही राजकारणाची पद्धत योग्य नाही,” अशी टीका म्हस्के यांनी केली. मीनाक्षी आणि राजेंद्र शिंदे यांच्यावर पूर्णेकर हत्येप्रकरणी होत असलेल्या आरोपांवरही म्हस्के यांनी भूमिका स्पष्ट केली. पोलिस तपास करीत आहेत. जो कोणी आरोपी असेल, त्याला पाठीशी घालणार नाही. तपासातून सत्य समोर येऊ द्या, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, पूर्णेकर कुटुंबाशी माझे वैयक्तिक संबंध आहेत. जयनाथ पूर्णेकर आजही माझा मित्र आहे. कुटुंबाला प्रामाणिक न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू,” असे म्हस्के यांनी सांगितले.
…………………….
...तर जबाबदार कोण?
सपना पाटकर प्रकरणाचा उल्लेख करत म्हस्के यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. सपना यांना कोणत्या पद्धतीने शिवीगाळ केली हे ही पाहावे. उद्या सपना यांना काही झाले, तर त्याला तुम्हाला जबाबदार धरणार का, असा सवाल त्यांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.