नेरूळमध्ये अवतरणार विज्ञानाचे अद्भूत विश्व
नवी मुंबईत उभारल्या जाणाऱ्या ‘सायन्स पार्क’साठी १०५.५१ कोटी
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ४ : पालिकेच्या वतीने नेरूळ येथील सेक्टर-१९अ मध्ये साकारल्या जाणाऱ्या महत्त्वाकांक्षी सायन्स पार्क प्रकल्पाच्या कामाला आता मोठी गती मिळणार आहे. या इमारतीमध्ये आधुनिक सायन्स प्रदर्शनी पुरवणे, बसवणे, ती सुरू करणे आणि त्यासाठी आवश्यक अंतर्गत स्थापत्य व सजावटीची कामे करण्यासाठी तब्बल १०५ कोटी ५१ लाख ४८ हजार १३१ रुपयांच्या वित्तीय प्रस्तावाला स्थायी समितीच्या मंजुरीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
शालेय विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडण्यासाठी आणि नागरिकांना नावीन्यपूर्ण सुविधा व मनोरंजनाची सोय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पालिकेतर्फे दोन टप्प्यांत या सायन्स पार्कची निर्मिती केली जात आहे. यातील पहिल्या टप्प्यातील इमारतीचे काम लवकरच पूर्ण होत आहे. शास्त्र व तंत्रज्ञान मानवाच्या जीवनाला कशा प्रकारे प्रभावी करेल, यावर प्रकाश टाकणारा हा एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प असणार आहे. यामध्ये विविध शास्त्रीय संकल्पनांची चित्रे, प्रदर्शनी, माहितीपट आणि प्रात्यक्षिक स्वरूपातील सादरीकरण यांचा समावेश असेल.
पाच प्रमुख संकल्पनांवर आधारित प्रदर्शन
जनन, ऊर्जा, पर्यावरण, अंतराळ, यंत्र आणि रोबोट
दिग्गज संस्थांच्या तज्ज्ञ समितीचे मार्गदर्शन
या प्रकल्पातील प्रदर्शनी व अंतर्गत सजावटीचे काम विशेष स्वरूपाचे आहे. त्यासाठी नेहरू सायन्स सेंटर, भाभा अणु संशोधन केंद्र आणि व्ही. जे. टी आय. मुंबई या संस्थांमधील तज्ज्ञांच्या कमिटीकडून प्राप्त सल्ल्यानुसार या कामाची आखणी भाग-१ व भाग-२ मध्ये करण्यात आली आहे. या प्रकल्पाचे सल्लागार वास्तुविशारद म्हणून मे. हितेन सेठी ॲण्ड असोसिएशन काम पाहत आहेत.
निविदा व आर्थिक खर्चाचा तपशील
या विशेष कामासाठी ई-निविदा प्रणालीद्वारे मागवलेल्या निविदांमध्ये पात्र ठरलेल्या श्रीष्टी इंटरप्रायझेस या कंत्राटदाराची निविदा स्वीकृत करण्याचे प्रस्तावित आहे. प्रस्तावित काम पूर्ण करण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी निश्चित केला आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीची अंतिम वित्तीय मंजुरी मिळण्यासाठी प्रशासनाकडून सादर केले आहे. ही मंजुरी मिळताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊन लवकरच नवी मुंबईतील विद्यार्थ्यांना व पर्यटकांना जागतिक दर्जाचे विज्ञान केंद्र अनुभवायला मिळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.