प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण
मीनाक्षी शिंदे, राजेंद्र शिंदे यांची नार्को चाचणी करा : सुषमा अंधारे
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पूर्णेकर यांच्या हत्येपूर्वी १५ दिवस रेकी सुरू असल्याचा दावा करीत त्यांनी हॉटेल महाराजा येथील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी केली. सर्व आरोपी व संशयितांचे कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) तपासून त्यांच्या संपर्काची साखळी शोधावी, तसेच मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांची नार्को चाचणी करावी, अशी मागणी अंधारे यांनी केली.
पूर्णेकर कुटुंबीयांच्या दुःखात शिवसेना ठामपणे उभी असल्याचे सांगत अंधारे म्हणाल्या, की पूर्णेकर हे पक्षाचे कडवट शिवसैनिक होते. क्लस्टर प्रकल्पातील गोरगरीब नागरिकांना हक्काचे घर मिळावे आणि या प्रक्रियेत गैरप्रकार होऊ नयेत यासाठी ते लढत होते, असा दावा त्यांनी केला. या प्रकरणात मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांची भूमिका तपासली जावी, अशी मागणी अंधारे यांनी केली. एका आरोपीच्या जबाबात मीनाक्षी शिंदे यांचे नाव आल्याचा दावा करीत त्याची सत्यता तपासावी तसेच संबंधित व्यक्तींचे सीडीआर, आर्थिक व्यवहार आणि परस्पर संबंधांची चौकशी करावी, असे त्या म्हणाल्या. पाच कोटी रुपयांच्या व्यवहाराची माहिती मिळाल्याचा दावा करीत पोलिसांनी त्याची सत्यता तपासावी, अशी मागणीही त्यांनी केली.
........
अधिकाऱ्यांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
तपास यंत्रणेतील अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही अंधारे यांनी प्रश्न उपस्थित केले. संबंधित पोलिस अधिकाऱ्यांची कारकीर्द आणि या प्रकरणातील तपासाची पद्धत यांची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. ‘‘आम्ही ऑडिओ, व्हिडिओ आणि अन्य माहिती पोलिसांना देत आहोत; तरीही महत्त्वाच्या व्यक्तींना ताब्यात घेतले जात नाही,’’ असा आरोप त्यांनी केला. न्याय मिळेपर्यंत पूर्णेकर कुटुंबीयांच्या पाठीशी राहून लढत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
........
‘सीबीआयमार्फत चौकशी करावी’
मीनाक्षी शिंदे यांनी काही आरोप ‘एआय’च्या माध्यमातून तयार केलेली माहिती असल्याचे म्हटल्याचा संदर्भ देत अंधारे यांनी ‘‘जर ही माहिती बनावट असेल, तर आठ महिन्यांपूर्वी सायबर पोलिसांकडे तक्रार का केली नाही?’’ असा प्रश्न उपस्थित केला. संबंधित व्यक्तींचीही चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. या प्रकरणाचा तपास व्यापक पद्धतीने करून सीबीआय किंवा एसआयटीमार्फत आवश्यक ती चौकशी करावी. हॉटेल महाराजा येथील सीसीटीव्ही फुटेज जप्त करावे आणि आर्थिक व्यवहारांची तपासणी करावी, अशी मागणी अंधारे यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.