केळ्यांच्या नावाखाली ‘विषाचा’ खेळ?
एपीएमसीतील केळी पिकवण्याच्या प्रक्रियेवर गंभीर सवाल; एफडीआयच्या तपासणीकडे लक्ष
तुर्भे, ता. ४ (बातमीदार) : वाशी येथील एपीएमसी आवारात केळी पिकवण्याच्या प्रक्रियेचा एक कथित व्हिडिओ समोर आल्याने फळांची गुणवत्ता आणि खाद्यसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या व्हिडिओमध्ये केळी पिकवताना दाखवण्यात आलेली प्रक्रिया नियमानुसार आहे की त्यात प्रतिबंधित रसायनांचा वापर केला जात आहे, याची सखोल चौकशी करण्याची जोरदार मागणी आता जोर धरू लागली आहे.
एपीएमसीमधून नवी मुंबईसह मुंबई, ठाणे आणि परिसरातील विविध भागांत मोठ्या प्रमाणात फळांचा पुरवठा केला जातो. त्यामुळे केळी पिकवण्याच्या प्रक्रियेत खाद्यसुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित व्यापाऱ्यांसह बाजार समितीतील देखरेख यंत्रणा आणि अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीवरही प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे.
चमकदार केळी म्हणजे सुरक्षितच असे नाही
बाजारात एकसारख्या रंगाची, चमकदार केळी ग्राहकांचे लक्ष वेधून घेतात. मात्र, केवळ रंग, चमक किंवा बाह्य स्वरूपावरून केळी सुरक्षित पद्धतीने पिकवली आहेत की नाही, हे निश्चित करता येत नाही. असामान्यपणे एकसारखा पिवळा रंग, बाहेरून पिकलेले दिसत असूनही आतून कडक राहणे, असामान्य वास किंवा चव जाणवणे यांसारख्या बाबींकडे ग्राहकांनी लक्ष देणे आवश्यक आहे.
व्यापाऱ्यांना नोटीसा
याप्रकरणी एपीएमसीचे सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांनी संबंधित व्यापाऱ्यांना नोटीस बजावण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असून, एफडीआयच्या अहवालानुसार संबंधित व्यापारी दोषी आढळल्यास त्यांचा परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता एफडीआय च्या तपासणीकडे लक्ष लागले आहे. केळी सुरक्षित पद्धतीने पिकवली जात आहेत की नियमांना बगल देऊन प्रक्रिया केली जात आहे, याचे उत्तर अधिकृत चौकशी आणि प्रयोगशाळा तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.