मुंबई, ता. ४ : ग्रामीण जीवन, पिढ्यांमधील दरी आणि ओस पडणाऱ्या गावांचे वास्तव मांडणाऱ्या ‘गमन’ या मराठी चित्रपटाच्या तिकीटविक्रीला सुरुवात झाली असून, मुंबईसह कोकणातील काही चित्रपटगृहांमध्ये चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे. २ ऑक्टोबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे दादर येथील भारतमाता थिएटरमधील बुकिंग १ ऑक्टोबरला सुरू झाले होते, मात्र सर्व्हर डाऊन असल्याचे कारण देत संध्याकाळी बुकिंग थांबवण्यात आले. यानंतर झालेल्या हस्तक्षेपामुळे अवघ्या १० मिनिटांत ऑनलाइन तिकीटविक्री पुन्हा सुरू झाली आहे.
याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते आणि लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी थिएटर प्रशासनाकडे विचारणा केली. मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी आणि शो टिकवण्यासाठी अडचणी येत असल्याचा मुद्दाही यानिमित्ताने पुन्हा चर्चेत आला. बुकिंग सुरू झाल्यानंतर भारतमाता थिएटरमध्ये शुक्रवार आणि शनिवारी प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला, तर रविवारी चित्रपटगृहात ‘हाउसफुल्ल’चा फलक लागल्याचे सांगण्यात आले. मुंबईतील गोरेगाव, बोरिवली, भांडुप आणि लालबाग तसेच कोकणातील कणकवली येथेही चित्रपटाचे काही शो हाउसफुल्ल झाल्याची माहिती देण्यात आली आहे. ‘गमन’मध्ये कोकणातील भाऊ-माई या वृद्ध दाम्पत्याचे आणि कुंदन-तारा या परप्रांतीय बहीण-भावाचे नाते उलगडत ग्रामीण जीवनातील बदलांचे चित्रण करण्यात आले आहे. चित्रपटाला नुकताच १२व्या शिमला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ज्युरीचा उत्कृष्ट चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. मालवणी भाषेचा वापर, शैलेश तांबे यांचे छायाचित्रण, प्रशांत कांबळे यांचे पार्श्वसंगीत आणि कलाकारांच्या अभिनयामुळे चित्रपटाची दखल घेतली जात आहे. चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद आणि महोत्सवातील गौरव यामुळे ‘गमन’च्या पुढील प्रदर्शनाकडे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.