बंगल्यांच्या गावात साकारतेय साई मंदिर
दातृत्वातून शेलघरमध्ये सामाजिक बांधिलकीचा नवा अध्याय
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ४ : महाराष्ट्रात बंगल्यांचे सुंदर व स्वच्छ गाव म्हणून नावारूपाला आलेले पनवेलमधील शेलघर आता एका नव्या वैभवाचे साक्षीदार ठरत आहे. कामगार नेते महेंद्र घरत यांच्या संकल्पनेतून गावात नऊ कोटींचे साई मंदिर उभारले जात असून, याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
शेलघरमध्ये १९९२ पासून म्हणजेच ३० ते ३५ वर्षांपूर्वीचे साई मंदिर होते. त्या काळी अवघ्या पाच लाख रुपयांत बांधलेल्या या मंदिरासाठी माजी खासदार राम ठाकूर यांनी अडीच लाख रुपयांची मदत केली होती. मात्र, काळाच्या ओघात हे जुने मंदिर मोडकळीस आल्याने त्याच जागेवर मंदिर उभारावे, अशी संकल्पना महेंद्र घरत यांनी ग्रामस्थांसमोर मांडली. या विचाराला मूर्त रूप देण्यासाठी साई संस्थान सेवाभावी संस्था या नोंदणीकृत संस्थेची स्थापना करण्यात आली. अरुण भगत यांनी अध्यक्षपदाची तर महेंद्र घरत यांनी सचिवपदाची धुरा सांभाळत ग्रामस्थांमध्ये समन्वयाचा भक्कम सेतू बांधून या प्रकल्पाचा पाया रचला. राम ठाकूर यांनी शेलघरचे जावई आणि सामाजिक बांधिलकी या नात्याने मंदिराच्या उभारणीसाठी तीन कोटींचे दान दिले आहे. राम ठाकूर आणि महेंद्र घरत यांचे राजकीय प्रवाह वेगळे असले, तरी गावच्या विकासात आणि सामाजिक उपक्रमांत दोघेही एकमेकांच्या साथीने उभे ठाकतात. माझा वारसा महेंद्र चालवतोय, असे राम ठाकूर अभिमानाने सांगत असतानाच मी राम ठाकूर यांना फॉलो करतो, अशी कृतज्ञता महेंद्र व्यक्त करतात.
वास्तुकलेचा आणि सोयी-सुविधांचा उत्कृष्ट नमुना
अंतिम टप्प्यात असलेल्या या नियोजित साई मंदिरात साईबाबा, गणपती आणि शिवशंकर यांच्या मनमोहक मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. याशिवाय मंदिरात दिवंगत जनार्दन आत्माराम भगत आणि शकुंतला रामशेठ ठाकूर यांच्या नावाने दोन सभागृहे असणार आहेत. पुजाऱ्यांच्या निवासाची व्यवस्था तसेच एकाच वेळी किमान ४० गाड्या पार्क करता येतील, अशी प्रशस्त पार्किंग जागाही या मंदिरात विकसित केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.