नांदगावमध्ये वाहतूक कोंडी
अरुंद मार्गामुळे वाहनचालक त्रस्त; बायपासचा प्रस्ताव मार्गी लावण्याची मागणी
मुरूड, ता. ४ (बातमीदार) : अरुंद रस्ते, वाहनांची वाढती संख्या आणि वाहतूक नियमन करणाऱ्या यंत्रणेचा अभाव यामुळे नांदगाव येथे वाहतूक कोंडीची समस्या नित्याची झाली आहे. मुरूड या पर्यटनस्थळी जाणाऱ्या वाहनांना नांदगाव बस स्थानक ते हनुमान मंदिरदरम्यान मोठ्या कोंडीचा सामना करावा लागत आहे.
या मार्गाच्या दोन्ही बाजूंना दुकाने असल्याने ग्राहकांची गर्दी असते. त्यात रस्त्यावर अस्ताव्यस्त पद्धतीने वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. नांदगावचा बुधवारचा आठवडी बाजार आणि शनिवार-रविवारच्या सुटीच्या दिवशी वाढणारी पर्यटकांची संख्या यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होते. वाहतूक सुरळीत करण्यासाठी स्थानिक नागरिकच वाहनचालकांना हाताने संकेत देत पोलिसांची भूमिका बजावताना दिसतात. या वेळी अनेकदा वाहनचालकांमध्ये बाचाबाचीचे प्रकारही घडतात.
नांदगावचे वळण पार करण्यासाठी वाहनांना १० ते १५ मिनिटांचा विलंब होतो. त्यामुळे पर्यटकांनाही या कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. सार्वत्रिक निवडणुकांच्या काळात नांदगाव बायपासचा मुद्दा चर्चेत येतो; मात्र प्रत्यक्षात त्याबाबत ठोस कार्यवाही होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. समुद्र-खाडी मार्गे बायपास करण्याबाबत चर्चा असली, तरी प्रत्यक्ष काम कधी सुरू होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
बायपासची मागणी
अलिबाग-मुरूड मार्गाचे काम पूर्णत्वाकडे जात असल्याने या मार्गावरील वाहतूक वाढली आहे. त्यामुळे नांदगावमधील कोंडीचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून नांदगाव बायपासचा प्रस्ताव मार्गी लावावा आणि वाहतूक कोंडीची समस्या सोडवावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांसह पर्यटकांकडून होत आहे.