नवरात्रनिमित्त अंबेमातेच्या रूपांना अखेरचा हात!
बेलापूर, ता. ४ (बातमीदार) : नवरात्रोत्सव अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपल्याने एकीकडे सार्वजनिक मंडळांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे, तर दुसरीकडे कारखान्यांमध्ये मूर्तिकारांकडून अंबेमातेच्या विविध रूपांवर अखेरचा हात फिरवण्यात येत आहे. यासोबतच मातेला सुवर्ण साज चढवणे, मागणीनुसार सुंदर वस्त्रे परिधान करणे आणि आकर्षक रंगकाम वेगाने सुरू आहे.
नवरात्रनिमित्त देवी मूर्ती तयार करणाऱ्या कारागिरांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शेवटचा हात मूर्तीवरून फिरवला जात आहे. सप्तशृंग आणि दुर्गा देवी मूर्तीस अधिक मागणी असल्याचे कारागिरांकडून सांगण्यात आले. उत्सवाचे आयोजन करणाऱ्या सार्वजनिक मंडळांकडून तयारीस वेग आला आहे. अनेक मंडळांकडून देवी मूर्ती स्थापना केली जात असते. त्यानिमित्त देवी मूर्ती तयार करण्याचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. बहुतांशी मूर्ती तयार झाल्या असून, उर्वरित मूर्तींवर कारागिरांकडून शेवटचा हात फिरवला जात आहे. आकर्षक अशा दीड ते दहा फुटापर्यंत मूर्ती साकारण्यात आल्या आहेत.
मातेची विविध रूपे :
सप्तशृंग देवी, दुर्गा देवी (शेरावाली), रेणुका देवी, तुळजाभवानी तसेच कोल्हापूरची महालक्ष्मी अशा विविध देवी मूर्ती साकारण्यात आल्या आहेत. सप्तशृंगी आणि दुर्गादेवी यांची अधिक मागणी असल्याने या मूर्ती अधिक साकारण्यात आल्या आहेत. त्यातल्या त्यात ग्रामीण भागातून सप्तशृंग देवी मूर्तीस अधिक मागणी असल्याने त्यांचीही निर्मिती इतरांच्या तुलनेत अधिक करण्यात आली.
मूर्तींना रंगकाम करण्यात येत आहे. मागणीनुसार वस्त्रे परिधान करण्यात येतात अन्यथा किंवा ऑइल पेंट वापरण्यात येतो.
- शशिकांत म्हात्रे, मूर्तिकार, बेलापूर