सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ४ : उल्हासनगरमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील महायुतीचा वाद उफाळून आल्यानंतर त्याचे पडसाद आता कल्याण-डोंबिवलीतही उमटू लागले आहेत. उल्हासनगर महापालिकेतील युतीतून बाहेर पडण्याची भाजपची भूमिका आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासाठी काम न करण्याच्या घोषणेनंतर दोन्ही पक्षांतील स्थानिक नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यातच केडीएमसीतील भाजप नगरसेवक मंदार टावरे यांनी उल्हासनगरचे महापौर अश्विनी निकम यांचे पती कमलेश निकम यांच्यावर केलेली टीका चर्चेत आली आहे.
कमलेश निकम यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर आरोप केल्यानंतर टावरे यांनी समाज माध्यमांवर पोस्टद्वारे त्यांना प्रत्युत्तर दिले. ‘उल्हासनगरच्या महापौर अडीच वर्षांची मुदत पूर्ण करणार नाहीत,’ अशी थेट भविष्यवाणीच त्यांनी केली. त्यामुळे उल्हासनगरचा राजकीय संघर्ष केडीएमसीच्या राजकीय वर्तुळातही पोहोचला आहे. वास्तविक, कल्याण-डोंबिवलीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील धुसफूस नवी नाही. महापालिका निवडणुकीनंतर सत्तास्थापनेपासूनच दोन्ही पक्षांमध्ये सत्तेतील वाटा, विकासकामांचे श्रेय आणि स्थानिक राजकीय वर्चस्वावरून कुरबुरी सुरू आहेत. त्यातच शिंदे गटाने सत्तास्थापनेसाठी मनसेच्या पाच नगरसेवकांचा पाठिंबा घेतल्याने भाजपमध्ये नाराजी निर्माण झाली होती. मनसेला सत्तेतून दूर करा, अन्यथा भाजप सत्तेतून बाहेर पडेल, असा इशाराही भाजपकडून देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर उल्हासनगरचा वाद म्हणजे केवळ एका महापालिकेतील स्थानिक सत्तासंघर्ष नसून त्याची छाया महायुतीच्या कल्याण-डोंबिवलीतील समीकरणांवरही पडू शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे.
उल्हासनगरमध्ये पेटलेली ठिणगी आता कल्याण-डोंबिवलीतील जुन्या धुसफुशीला हवा देणार का, हा खरा प्रश्न आहे. महायुती म्हणून निवडणुका लढताना एकत्र दिसणारे भाजप आणि शिवसेना शिंदे गट स्थानिक सत्तेच्या गणितात मात्र पुन्हा आमनेसामने येत असल्याचे चित्र आहे. आगामी काळात वरिष्ठ नेतृत्व हा वाद कितपत आवरते आणि स्थानिक पातळीवरील हे मतभेद निवडणुकीच्या राजकारणात किती पुढे जातात, याकडे लक्ष लागले आहे.
२०२४मधील मतभेद
यापूर्वी २०२४च्या लोकसभा निवडणुकीतही कल्याणच्या जागेवरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील मतभेद उघड झाले होते. स्थानिक भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कल्याणची जागा भाजपला मिळावी, अशी भूमिका घेत श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे हेच महायुतीचे उमेदवार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर वादावर पडदा पडला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.