मुंबई

कांदा-बटाटा बाजारात गोणीचा वाद

CD

जुईनगर, ता. ४ (बातमीदार) : राष्ट्रीय महत्त्वाच्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा-बटाटा बाजारातील ५० किलोच्या गोणीचा वाद गेल्या पाच वर्षांपासून धुमसत आहे. गोणीचे वजन वाढले की माथाडी कामगारांकडून आंदोलन, रास्ता रोको किंवा बाजार बंदची भूमिका घेतली जाते. मात्र, या संघर्षाच्या मुळाशी असलेल्या मालाच्या वजनाची जबाबदारी नेमकी कोणाची, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. बाजारात येणाऱ्या मालापैकी मोठ्या प्रमाणावर व्यवहार व्यापारी-व्यापारी पातळीवर होत असताना माल मागवितानाच ५० किलोपेक्षा अधिक वजनाच्या गोणी पाठवू नयेत, अशी स्पष्ट अट व्यापारी का घालत नाहीत, असा सवाल माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी उपस्थित केला आहे.

कांदा-बटाटा बाजारातील व्यापारी राज्यातील तसेच परराज्यातील व्यापाऱ्यांकडून माल मागवितात. मालाची मागणी, दर, प्रमाण, पॅकिंग आणि वाहतुकीबाबत दोन्ही बाजूंमध्ये नियमित संपर्क असतो. त्यामुळे माल पाठविण्यापूर्वीच ‘५० किलोपेक्षा अधिक वजनाच्या गोणी पाठवू नका’ अशी अट घालणे शक्य असतानाही त्याकडे दुर्लक्ष का केले जाते, असा प्रश्न माथाडी संघटनांनी उपस्थित केला आहे.

कांदा-बटाट्याच्या शेतमालासाठी ५० किलोपेक्षा अधिक वजन वाहून नेऊ नये, यासंदर्भात पणन संचालनालयाच्या नोंदीत स्वतंत्र परिपत्रकाचा उल्लेख असल्याचे माथाडी संघटनांचे म्हणणे आहे. हाताने वजन उचलणाऱ्या कामगारांच्या आरोग्य व सुरक्षिततेचा मुद्दाही महत्त्वाचा असल्याने केवळ परिपत्रक काढून प्रश्न सुटणार नाही. नियमाचे उल्लंघन झाल्यास माल पाठविणाऱ्यापासून ते बाजारातील खरेदीदारापर्यंत जबाबदारी निश्चित करून दंडात्मक कारवाईची स्पष्ट व्यवस्था करावी, अशी मागणी पुढे आली आहे.

वजनाची जबाबदारी निश्चित करा
गहू, तांदूळ आणि अन्य शेतमाल मागविताना व्यापारी वजन, पॅकिंग आणि पोत्याच्या प्रकाराबाबत स्पष्ट सूचना देतात. मग कांदा-बटाट्याच्या बाबतीत ५० किलोपेक्षा अधिक वजनाच्या गोणी वारंवार बाजारात कशा येतात, असा सवाल माथाडी संघटनांनी उपस्थित केला आहे. शेतकऱ्यांच्या नावावर जबाबदारी झटकण्याऐवजी मालाच्या व्यवहाराच्या पहिल्याच टप्प्यावर वजनाची जबाबदारी निश्चित करा, अशी मागणी आता जोर धरत आहे.

जर व्यापाऱ्यांना मालाचा दर, प्रमाण, दर्जा आणि बाजारात पोहोचण्याची वेळ सांगता येते, तर गोणीचे वजनही निश्चित करता येऊ शकते. शेतकऱ्यांच्या नावावर व्यापारी आणि माथाडी यांच्यात संघर्ष निर्माण करण्यापेक्षा व्यापाऱ्यांनी माल मागवितानाच वजनाची स्पष्ट अट घालावी. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नावाचा आधार घेण्याची किंवा माथाडी कामगारांना आंदोलन करण्याची परिस्थिती निर्माण होणार नाही. या संपूर्ण प्रकरणात शेतकरी हा सर्वात महत्त्वाचा घटक असला तरी त्याच्या नावाचा वापर करून व्यापारी स्वतःची जबाबदारी टाळत आहेत.
- नरेंद्र पाटील, माथाडी नेते

Gangapur News : अवैध दारू विक्री वाढल्याने वरखेड गावात महिला व ग्रामस्थांनी काढला गांधीगिरी मोर्चा; दारू विक्रीविरोधात ग्रामसभेत ठराव मंजूर

Nilanga News : मदतीसाठी कागदपत्रांचा ससेमिरा! गावाचा एकच पंचनामा करून सरसकट मदत द्या; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी

Latest Marathi News Live Update : शिक्षक भरतीत लाखोंची फसवणूक, अपूर्व हिरेंसह पाच जणांवर गुन्हा

Pune News : उजनीतील खासगी मासेमारी ठेका प्रक्रिया रद्द; जलसंपदा विभागाच्या बैठकीत निर्णय

Baramati Crime : शेरेवाडी दुहेरी खूनाचा गुन्हा उघड....; नातलगानेच केला दुहेरी खून....

SCROLL FOR NEXT