वज्रेश्वरी, ता. ६ (बातमीदार) : भिवंडीच्या ग्रामीण भागात पावसाने काही दिवसांपासून पाठ फिरवल्याने भातपिकाला पाण्याची तीव्र गरज निर्माण झाली आहे. वज्रेश्वरी, अकलोली, वेढे, घोटगाव, दुगाड, भिवाळी, गरवा व हलवर परिसरातील शेतकरी भातपीक वाचविण्यासाठी मोठी धडपड करत आहेत. अनेक शेतकरी विहिरी तसेच बोअरविहिरींचे पाणी मोटारीच्या साह्याने शेतात सोडून पीक वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
यंदा सुरुवातीच्या काळात समाधानकारक पाऊस झाल्याने भातपिकाची वाढ चांगली झाली होती, मात्र आता पावसाने उघडीप दिल्याने शेतातील पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. पिकाला वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर सातत्याने पाण्याची आवश्यकता असताना पावसाचा खंड पडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. भात हे भिवंडी ग्रामीण भागातील प्रमुख खरीप पीक असून, हजारो शेतकऱ्यांचे आर्थिक गणित या पिकावर अवलंबून आहे. पावसाने आणखी दडी मारल्यास उत्पादनावर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे भातपीक वाचविण्यासाठी आता पावसाच्या दमदार पुनरागमनाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली आहे.
विहिरी, कूपनलिकांचा आधार
पावसाची प्रतीक्षा करण्यापेक्षा पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी उपलब्ध पर्यायांचा आधार घेतला आहे. काही ठिकाणी विहिरीतील पाणी मोटारीने शेतात सोडले जात आहे, तर काही शेतकरी कूपनलिकांच्या पाण्यावर भातशेती टिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत, मात्र सतत मोटार चालविल्याने वीजबिलाचा खर्च वाढत असून, विहिरी व बोअरविहिरींच्या पाणीसाठ्यावरही ताण येत आहे.
आता पाऊस झाला नाही तर विहीर आणि कूपनलिकेच्या पाण्यावर पीक किती दिवस टिकवणार, हा प्रश्न आहे. पीक हातातून जाऊ नये म्हणून मोटारीने पाणी देण्याची धडपड सुरू आहे.
- माधुरी भोईर, महिला, वेढेपाडा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.