वज्रेश्वरी, ता. ६ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील नांदिठणे, देपोली आणि एकसाल येथील तीन रेशन दुकानांमध्ये धान्याचा गैरव्यवहार आढळून आल्यानंतर अखेर संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. श्रमजीवी संघटनेने याप्रकरणी सातत्याने पाठपुरावा करून कारवाईसाठी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाने ही कारवाई केली.
सरकारकडून मिळणाऱ्या मोफत आणि सवलतीच्या धान्यात गैरव्यवहार होत असल्याची तक्रार श्रमजीवी संघटनेकडे आली होती. त्यानंतर तालुकापुरवठा निरीक्षक गौतम राऊत यांच्या उपस्थितीत संबंधित रेशन दुकानांचे पंचनामे करण्यात आले. नांदिठणे येथील दुकानाचा ४ सप्टेंबर, देपोली येथील दुकानाचा ८ सप्टेंबर आणि एकसाल येथील दुकानाचा २१ सप्टेंबरला पंचनामा करण्यात आला. तहसील कार्यालयाच्या २३ सप्टेंबरच्या अहवालानुसार तिन्ही दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात धान्याचा अपहार झाल्याचे चौकशीत आढळून आले.
पंचनाम्यात गैरव्यवहार आढळून आल्यानंतरही संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करण्यास विलंब होत असल्याने श्रमजीवी संघटनेचे भिवंडी ग्रामीण तालुकाध्यक्ष सागर देसक आणि सचिव विश्वनाथ पासरी यांनी ५ ऑक्टोबरला तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला होता. संघटनेच्या आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासनाने तातडीने कारवाई करत अत्यावश्यक वस्तू कायदा, राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गणेशपुरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.
ई-पॉस यंत्रावर लाभार्थ्यांचे अंगठे
देपोली येथील जीवदानी महिला बचत गट संचलित रेशन दुकानात जुलै आणि ऑगस्टदरम्यान ई-पॉस यंत्रावर लाभार्थ्यांचे अंगठे घेण्यात आल्यानंतर २६६ किलो तांदूळ आणि ५७२ किलो गव्हाचा अपहार करून कातकरी कुटुंबांना कमी धान्य दिल्याचे निष्पन्न झाल्याचे अहवालात नमूद आहे. नांदिठणे आणि एकसाल येथील दुकानांमध्येही अशाच प्रकारचा गैरव्यवहार आढळून आल्याचे सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.