वाशीतील पदपथांवर निराधारांचा वाढता वावर
कोपरखैरणे, ता. ६ (बातमीदार) : वाशी सेक्टर नऊ आणि सेक्टर १० ए परिसरात बेघर, निराधार, आजारी रुग्ण, मनोरुग्ण आणि व्यसनाधीन व्यक्तींचा वावर दिवसेंदिवस वाढत आहे. प्रथम संदर्भ रुग्णालय ते सेंट मेरी स्कूलदरम्यानच्या पदपथांवर नागरिकांसाठी बसवण्यात आलेल्या बाकड्यांचा आणि निवारा शेडचा वापर सध्या हे नागरिक निवासासाठी करत आहेत. यामुळे परिसरात अस्वच्छतेसह रहिवासी, महिला आणि शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
बाकड्यांचा आणि निवारा शेडचा वापर सध्या अनेक बेघर व्यक्तींकडून मुक्कामासाठी केला जात आहे. दिवसभर याच ठिकाणी बसणे किंवा झोपणे, कपडे व इतर साहित्य ठेवणे असे प्रकार सुरू असतात. यामुळे पाल्यांना शाळेतून घेण्यासाठी येणाऱ्या पालकांना आणि रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागते. विविध आजारांनी ग्रस्त असण्याची शक्यता असलेल्या व्यक्तींच्या वास्तव्यामुळे बाकड्यांच्या स्वच्छतेचा प्रश्न बिकट झाला आहे. वाशी बस डेपोच्या मागील बाजूस विविध धार्मिक संस्था व समाजभवनांकडून मोफत अन्नदान केले जाते. अन्नदानाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने बेघर व व्यसनाधीन व्यक्ती येथे जमा होतात. एकीकडे बेघर आणि निराधार व्यक्तींचे पुनर्वसन हा सामाजिक प्रश्न असला तरी सार्वजनिक ठिकाणी त्यांचे अनियंत्रित वास्तव्य होऊ नये, यासाठी महापालिकेने सातत्याने उपाययोजना करणे आवश्यक आहे. संबंधित व्यक्तींची आरोग्य तपासणी, समुपदेशन, व्यसनमुक्ती आणि कायमस्वरूपी पुनर्वसन याबाबत संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे दीर्घकाळ वास्तव्य करणाऱ्या व्यक्तींच्या आरोग्याची तसेच त्यांच्या पुनर्वसनाचीही योग्य व्यवस्था होणे गरजेचे आहे असे मत नगरसेवक किशोर पाटकर यांनी बोलताना व्यक्त केले.
कारवाईनंतरही पुन्हा वाशीत आगमन
या संदर्भात नवी मुंबई महापालिकेच्या वाशी विभाग कार्यालयाचे विभाग अधिकारी येडवे यांच्याशी संपर्क साधला असता, महापालिकेकडून वेळोवेळी अशा निराधार व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांना खोपोली, तळेगाव आदी ठिकाणी सोडण्यात येते. मात्र, काही कालावधीनंतर हे घटक पुन्हा एक-एक करून वाशी परिसरात परत येतात, अशी माहिती त्यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.