कोपरखैरणेत अनधिकृत पाणीवापरावर पालिकेची धडक कारवाई
१८ बांधकामावरील नळजोडण्या खंडित; पाण्याचा गैरवापर करणाऱ्या ३५ जणांना नोटिसा
वाशी, ता. ६ (बातमीदार) ः शहरातील पाणीसाठ्यावर वाढता ताण लक्षात घेता पालिका प्रशासनाने अनधिकृत पाणीवापर आणि पाणीचोरीविरोधात आक्रमक पावले उचलली आहेत. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या आदेशानुसार कोपरखैरणे परिसरात राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत बेकायदेशीररीत्या पाणी वापरणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात आली. शहर अभियंता शिरीष आरदवड, सहाय्यक अतिरिक्त शहर अभियंता मदन वाघचौडे, कार्यकारी अभियंता शंकर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
उपअभियंता अजित भवारी यांच्या नेतृत्वाखालील कनिष्ठ अभियंता विनोद जैन यांच्या पथकाने कोपरखैरणे परिसरातील विविध बांधकाम प्रकल्प तसेच इतर ठिकाणी पाणीपुरवठा व्यवस्थेची तपासणी केली. तपासणीदरम्यान काही ठिकाणी अनधिकृत जोडण्यांद्वारे पाण्याचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले. महापालिका पथकाने कारवाई करत तब्बल १८ बांधकाम पाणीजोडण्या तत्काळ खंडित केल्या. तसेच पाण्याचा गैरवापर करणाऱ्या ३५ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या. अनधिकृतरीत्या पाणी उपसण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ११ मोटारी जप्त करण्यात आल्या असून, सुमारे दोन हजार मीटर रनिंग पीव्हीसी पाइप जप्त करण्यात आले आहेत.
शहरातील उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन आणि सर्व नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी अनधिकृत पाणी वापर, पाणीचोरी तसेच पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या धडक कारवाईमुळे अनधिकृतरीत्या पाणी वापरणाऱ्या तसेच पाणीचोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, पालिकेच्या कारवाईमुळे परिसरातील बेकायदा पाणीजोडण्यांना आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.