शिवडी, ता. ६ (बातमीदार) : राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने एनटीसी गिरणी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी मुंबईतील चार बंद गिरण्यांमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला दिवसेंदिवस पाठिंबा मिळत आहे. दादर येथील दादासाहेब फाळके रोडवरील टाटा मिलमध्ये सुरू असलेल्या साखळी उपोषणाला सोमवारी (ता. ५) विभागीय आमदार कालिदास कोळंबकर यांनी भेट देऊन कामगारांशी संवाद साधला. एनटीसी कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आणि सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
कामगारांच्या साखळी उपोषणाचा हा २९वा दिवस आहे. या वेळी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे खजिनदार निवृत्ती देसाई, संघटन सेक्रेटरी दीपक राणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, विधान परिषदेचे उपसभापती व कामगार नेते सचिन अहिर यांनी केंद्र सरकारने कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावेत, अशी मागणी केली. संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा इशारा दिला असून, बेलार्ड पिअर येथील एनटीसी प्रधान कार्यालयावर मोर्चा काढण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले.
कामगारांनी थकीत पगार, ग्रॅच्युइटी आणि कायदेशीर देणी तातडीने मिळावीत, अशी मागणी केली आहे.
शिवडी : आमदार कालिदास कोळंबकर यांनी कामगारांशी संवाद साधला.