कांदिवली पादचारी पुलाची दुरवस्था
कचरा, पान-गुटख्याच्या पिचकाऱ्यांनी अस्वच्छता; सुरक्षेकडेही दुर्लक्ष
कांदिवली, ता. ७ (बातमीदार) : कांदिवली पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या रेल्वे पादचारी पुलाची स्वच्छता आणि सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुलावर ठिकठिकाणी कचरा, घाण तसेच पान-गुटख्याच्या पिचकाऱ्यांचे डाग दिसत असून, दुर्गंधीयुक्त वातावरणातून प्रवाशांना ये-जा करावी लागत आहे. दररोज हजारो प्रवासी या पुलाचा वापर करतात.
पुलाच्या पायऱ्यांवर कागद, प्लॅस्टिकच्या पिशव्या, उरलेले अन्न पदार्थ आणि अन्य कचरा साचलेला आहे. जाहिरातींमुळे पुलाचे विद्रूपीकरण झाले असून, परिसरात दिवस-रात्र काही बेघर महिला व पुरुष थांबत असल्याने अस्वच्छता वाढत असल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे. तिकीट खिडकीजवळ काही जण झोपलेले किंवा पैसे मागताना दिसतात. पायऱ्यांवर भीक मागणाऱ्यांमुळे प्रवाशांना अडथळा निर्माण होत असल्याचेही प्रवाशांचे म्हणणे आहे.
पुलाच्या परिसरात काही महिला दिवसभर थांबत असल्याने तसेच गैरप्रकार घडत असल्याच्या तक्रारीही प्रवाशांनी केल्या आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासन आणि पोलिसांनी प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीची तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.
रेल्वे प्रशासनाकडून स्वच्छतेसाठी विविध मोहिमा राबविल्या जात असल्या, तरी कांदिवलीतील पादचारी पुलावरील परिस्थितीमुळे त्याच्या अंमलबजावणीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. पुलाची नियमित साफसफाई करावी, कचरा टाकणाऱ्यांसह पान-गुटखा खाऊन थुंकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी आणि रेल्वे पोलिसांची गस्त वाढवावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. रेल्वे प्रशासन आणि पालिकेने महिन्यातून एकदा पुलावर स्वच्छता अभियान राबवावे, अशीही मागणी आहे.
पालिकेच्या हद्दीतील पुलाची पाहणी करू
पादचारी पूल तसेच स्कायवॉक पालिकेच्या अखत्यारित येतो. आमच्या हद्दीतील पुलाची पाहणी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे रेल्वे स्टेशन अधिकारी धनंजय जाधव यांनी सांगितले.
गुटखा-पान खाऊन थुंकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी. रेल्वे पोलिसांची गस्त वाढवून महिन्यातून एकदा पुलावर स्वच्छता अभियान राबवावे.
- यतीन भिंगार्डे, रेल्वे प्रवासी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.