पनवेलच्या हवेत वाहनांचा धूर!
४६ टक्के प्रदूषण रस्ते वाहतुकीमुळे धूळ नियंत्रण, रस्ते सफाई, सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देण्याची शिफारस
पनवेल, ता. ७ (बातमीदार) : शहराच्या हवेत प्रदूषणाचा भार चिंताजनकरीतीने वाढत असल्याचे समोर आले आहे. पनवेल पालिका क्षेत्रातील वायू प्रदूषणाचा अभ्यास करताना एकूण प्रदूषणापैकी तब्बल ४६ टक्के प्रदूषण केवळ रस्ते वाहतुकीमुळे होत असल्याचे पर्यावरणीय अहवालातून स्पष्ट झाले आहे. वाढती वाहनसंख्या, महामार्गांवरील अवजड वाहतूक आणि शहरांतर्गत वाहतुकीचा ताण हा पनवेलच्या हवेच्या गुणवत्तेसमोरील सर्वात मोठा प्रश्न ठरला आहे.
महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे उपायुक्त स्वरूप खारगे यांनी हा अहवाल महासभेत सादर केला. अहवालातील स्रोतवार विश्लेषणानुसार रस्ते वाहतुकीनंतर बांधकाम क्षेत्राचा प्रदूषणातील वाटा २० टक्के आहे. मोकळ्या जागेतील धुळीचा वाटा १५ टक्के, औद्योगिक क्षेत्राचा १० टक्के, तर कचरा जाळण्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा वाटा पाच टक्के असल्याचे अहवालात नमूद केले आहे. विशेष म्हणजे वाहतूक आणि बांधकाम या दोन स्रोतांचा एकत्रित वाटा तब्बल ६६ टक्के असल्याने प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजनांचा केंद्रबिंदू याच दोन क्षेत्रांवर असणे आवश्यक असल्याचे अहवालातून अधोरेखित झाले आहे.
महामार्गांमुळे पनवेलच्या हवेला मोठा भार!
पनवेल, कळंबोली, कामोठे आणि तळोजा परिसरातून पनवेल-सायन, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४, मुंबई-गोवा महामार्ग तसेच मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. अवजड वाहनांची वर्दळ आणि अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूक यामुळे वाहनांमधून होणारे उत्सर्जन वाढत आहे. त्यामुळे वाहतूक नियोजनाचा प्रश्न आता केवळ वाहतूक कोंडीपुरता राहिलेला नसून, तो शहराच्या पर्यावरणीय आरोग्याशीही जोडला गेला आहे.
बांधकामांचा धुरळा हवेत !
परिसरात मोठ्या प्रमाणावर गृहनिर्माण प्रकल्प सुरू आहेत. त्याचबरोबर मेट्रो, रस्ते आणि विविध पायाभूत सुविधांची कामे सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात बांधकाम साहित्याची आणि मातीची वाहतूक होत आहे. बांधकामाच्या ठिकाणी धूळ नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना न केल्यास सूक्ष्म धूलिकण हवेत मिसळण्याची शक्यता वाढते.
मोकळ्या जागेतील धुळीचा १५ टक्के वाटा!
वायू प्रदूषणाच्या स्रोतांमध्ये मोकळ्या जागेतून निर्माण होणाऱ्या धुळीचा वाटा १५ टक्के असल्याचे अहवालातून समोर आले आहे. शहराचा विस्तार होत असताना अनेक ठिकाणी मोकळ्या जागा, कच्चे रस्ते, बांधकामासाठी साठवलेली माती आणि वाहनांच्या वर्दळीमुळे उडणारी धूळ हा प्रदूषणाचा महत्त्वाचा घटक ठरत आहे. रस्त्यांवर साचलेली धूळ वाहनांच्या चाकांमुळे पुन्हा हवेत मिसळते. त्यामुळे केवळ रस्ते धुण्याऐवजी नियमित आणि यांत्रिक पद्धतीने रस्त्यांची सफाई करण्यावर भर देण्याची शिफारस अहवालात करण्यात आली आहे.
तळोजा औद्योगिक क्षेत्राचाही वाटा!
पनवेल महापालिका क्षेत्रालगत असलेल्या तळोजा औद्योगिक परिसरातील औद्योगिक उत्सर्जनाचा प्रदूषणातील वाटा १० टक्के असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. विविध औद्योगिक आस्थापनांमधून होणारे उत्सर्जन, त्याचे नियंत्रण आणि त्यावर देखरेख हा पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय आहे.
कचरा जाळण्यावरही नियंत्रणाची गरज!
कचरा उघड्यावर जाळल्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा वाटा पाच टक्के असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. टक्केवारी तुलनेने कमी असली तरी कचरा जाळण्याच्या प्रक्रियेत निर्माण होणारा धूर आणि विविध प्रकारची प्रदूषके नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे कचरा संकलनाची प्रभावी व्यवस्था, उघड्यावर कचरा जाळण्यास प्रतिबंध आणि नियमभंग करणाऱ्यांवर सातत्याने कारवाई यावर महापालिकेला भर द्यावा लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.