मुंबई

सिडको वसाहतींचाही ‘श्वास’ कोंडला!

CD

सिडको वसाहतींचाही ‘श्वास’ कोंडला!
दुहेरी पार्किंग, अतिक्रमणे अन् वाढत्या वाहनसंख्येमुळे अंतर्गत रस्ते झाले अरुंद
पनवेल, ता. ७ (बातमीदार) ः शहरातील कोंडीची समस्या जुनी असली तरी आता सिडकोच्या नियोजित वसाहतींमध्येही अंतर्गत वाहतुकीचा प्रश्न गंभीर रूप धारण करीत आहे. नवीन पनवेल, खांदा कॉलनी, कामोठे, कळंबोली आणि खारघर या वसाहतींमध्ये गेल्या काही वर्षांत लोकसंख्या आणि वाहनांची संख्या झपाट्याने वाढली; मात्र त्या तुलनेत पार्किंगची व्यवस्था उपलब्ध झाली नाही. परिणामी रहिवासी आपली वाहने थेट रस्त्यावर उभी करीत असल्याने दुहेरी पार्किंगमुळे अंतर्गत रस्ते अरुंद झाले आहेत. त्यातच फेरीवाले व दुकानदारांची अतिक्रमणे यामुळे सिडको वसाहतींतील रस्त्यांचा श्वास कोंडला आहे.
पनवेल शहर व्यापारी पेठ असल्याने तेथील रस्ते तुलनेने अरुंद आहेत. बाजारपेठेतील वाढती गर्दी आणि वाहनांची संख्या यामुळे वाहतूक कोंडीची समस्या अनेक वर्षांपासून कायम आहे. अशात सिडकोच्या जुन्या वसाहतींवर लोकसंख्येचा ताण वाढला आहे. पूर्वीच्या तुलनेत प्रत्येक कुटुंबाकडे असलेल्या वाहनांची संख्या वाढली आहे. मात्र, जुन्या वसाहतींची रचना आणि उपलब्ध पार्किंग जागा आजच्या वाहनसंख्येला पुरेशा ठरत नाहीत. यावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेकडून पार्किंगच्या सुविधेकरिता पावले उचलली जात आहेत. मात्र, शहरासोबतच सिडको वसाहतींसाठीही स्वतंत्र आणि दीर्घकालीन पार्किंग-वाहतूक आराखडा तयार करण्याची गरज आहे.

कळंबोलीत अरुंद रस्त्यांवर वाहनांचा विळखा!
कळंबोलीमध्ये अंतर्गत वाहतुकीची समस्या विशेषतः जाणवते. एलआयसी परिसरातील वाहने मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उभी राहत असल्याने रहदारीला अडथळा निर्माण होतो. सेक्टर १४ मधील काही अंतर्गत रस्ते अरुंद असून, तेथे घरांची विशिष्ट रचना आणि वाढलेली वाहनसंख्या यामुळे वाहतुकीचा प्रश्न अधिक तीव्र झाला आहे. बीयूडीपी घरांसमोर रो-हाउसची रचना असलेल्या भागातही अशीच परिस्थिती आहे. काही रो-हाउसच्या तळमजल्याचा वापर व्यावसायिक कारणांसाठी होत असल्याने पार्किंगची मूळ जागा उपलब्ध राहत नाही. सहा मीटर रुंदीच्या रस्त्यावरच अडीच ते तीन मीटर जागा वाहनांनी व्यापल्यास उरलेल्या जागेतून दोन वाहने समोरासमोर जाणेही अवघड होते.

कामोठ्यात दोन लेन पार्किंगसाठीच
कामोठे वसाहतीची रस्त्यांची रचना तुलनेने प्रशस्त असली तरी दुहेरी पार्किंगमुळे उपलब्ध रस्त्याची रुंदी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.
सकाळ-संध्याकाळच्या वेळी गर्दी वाढल्याने कोंडीत भर पडते. तर मोठ्या वाहनांना वळण घेताना किंवा समोरून येणाऱ्या वाहनाला जागा देताना संपूर्ण वाहतूक काही काळ ठप्प होण्याचे प्रकार घडतात.

खांदा कॉलनी, नवीन पनवेल आणि खारघरही अपवाद नाही!
खांदा कॉलनीतही रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांचे पार्किंग वाढल्याने अंतर्गत वाहतुकीवर परिणाम होत आहे. नवीन पनवेलमध्ये वाढती लोकसंख्या, बाजारपेठा, शैक्षणिक संस्था आणि दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांमुळे अंतर्गत रस्त्यांवरील वाहनांची संख्या मोठी झाली आहे. खारघरमध्येही नियोजित रस्ते असले तरी वाढती वाहनसंख्या आणि रस्त्यालगतचे पार्किंग यामुळे वाहतुकीचा वेग कमी होतो.

फेरीवाले, दुकानदारांचे अतिक्रमण आणि पार्किंगची भर!
वाहतूक कोंडीचे एकमेव कारण पार्किंग नाही. अनेक अंतर्गत रस्त्यांवर फेरीवाले आणि दुकानदारांकडून रस्त्यालगतची जागा वापरली जाते. ग्राहकांची वाहने त्याच ठिकाणी थांबतात. त्यामुळे रस्त्याची उपलब्ध रुंदी आणखी कमी होते. एका बाजूला पार्किंग, दुसऱ्या बाजूला फेरीवाले किंवा दुकानांचा पसारा आणि मधून जाणारी वाहने अशी स्थिती निर्माण झाल्याने वाहतूक विस्कळित होते.

महापालिका-वाहतूक पोलिसांच्या संयुक्त कारवाईची गरज!
सिडको वसाहती आता महापालिका क्षेत्राचा महत्त्वाचा भाग आहेत. त्यामुळे कोंडीवर उपाय करण्यासाठी महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे नियोजन करणे गरजेचे आहे. रस्त्यांवरील बेकायदा पार्किंगवर नियमित कारवाई, दुहेरी पार्किंगला प्रतिबंध, आवश्यक ठिकाणी नो पार्किंग क्षेत्र, फेरीवाल्यांसाठी निश्चित जागा आणि दुकानदारांकडून रस्त्याची जागा अडवली जाणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर केवळ दंडात्मक कारवाई करून प्रश्न सुटणार नाही. बहुमजली किंवा सामूहिक वाहनतळ, उपलब्ध मोकळ्या जागांचा नियोजनबद्ध वापर आणि वसाहतीनिहाय पार्किंग आराखडा यासारख्या कायमस्वरूपी उपायांवर भर देणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ ODI Squad: ट्वेंटी-२० संघ जाहीर केला, मग वन डेचा का नाही? निवड समिती पर्यायी संघ निवडण्याच्या तयारीत; पण असं का?

Ladki Bahin Yojana : 'कोणी मायका लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही'; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही केलं भाष्य

Kannad Drought : दुष्काळाच्या झळा! दुष्काळामुळे शेतीतील रोजगार संपला; ऊसतोडीला जाणा-या मजुरांच्या संख्येत मोठी वाढ

CJP Jantar Mantar Protest: शनिवारी सीजेपीचं पुन्हा 'जंतरमंतर'! मुख्य प्रवक्ते सौरव दास दिल्ली पोलिसांच्या भेटीला, म्हणाले...

Latest Marathi News Live Update : दिल्लीत मुख्यमंत्री फडणवीसांची अमित शाहांशी भेट; दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

SCROLL FOR NEXT