आशा सेविकांच्या प्रश्नांवर चर्चा
अडचणी सोडविण्याचे महापौरांची आश्वासन
पनवेल, ता. ७ (बातमीदार) : पनवेल महापालिकेच्या आशा सेविकांनी महापौर दालनात महापौर नितीन पाटील यांची भेट घेऊन मानधन, कामकाजातील अडचणी, आवश्यक सुविधा आणि विविध प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा केली. या वेळी महापौरांनी त्यांच्या समस्या जाणून घेत आवश्यक उपाययोजनांसाठी सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन दिले.
महापालिका क्षेत्रातील महिला, बालके, ज्येष्ठ नागरिक आणि गरजू कुटुंबांपर्यंत आरोग्यविषयक सेवा तसेच विविध शासकीय आरोग्य योजनांचा लाभ पोहोचविण्यात आशा सेविकांची महत्त्वाची भूमिका आहे, मात्र दैनंदिन कामकाजात येणाऱ्या विविध अडचणी दूर करण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा आशा सेविकांनी व्यक्त केली.
या वेळी आशा सेविकांनी आपल्या विविध मागण्या आणि प्रलंबित प्रश्न महापौरांसमोर मांडले. त्यांचे म्हणणे ऐकून घेत महापौर नितीन पाटील यांनी आशा सेविका या आरोग्य व्यवस्थेतील महत्त्वाचा दुवा असल्याचे सांगितले. नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यात त्यांचे योगदान मोलाचे असून, त्यांच्या प्रश्नांचा योग्य तो विचार करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
महापौरांच्या सकारात्मक भूमिकेमुळे आशा सेविकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांना प्रशासनाच्या माध्यमातून योग्य दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
फोटो