भिवंडी, ता. ७ (बातमीदार) : भिवंडी-निजामपूर शहर महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना यंदा प्रत्येकी २० हजार रुपये दिवाळी सानुग्रह अनुदान देण्यात यावे, अशी मागणी भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने महापालिका आयुक्त आणि महापौरांकडे केली आहे. तसेच २०२२ मध्ये मंजूर झालेल्या सेवाशर्ती व आकृतीबंधातील १७ पदांची दुरुस्ती होईपर्यंत पदोन्नतीची प्रक्रिया स्थगित ठेवावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
महापालिका प्रशासन आणि कामगार संघटनांच्या बैठकीत आर्थिक परिस्थितीचे कारण देत दरवर्षी सानुग्रह अनुदानात कपात केली जात असल्याचे महासंघाचे म्हणणे आहे. महापालिकेच्या अंदाजपत्रकात तरतूद असतानाही २०२५मध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १४ हजार ५०० रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले. यंदा महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली असल्याने प्रत्येकी २० हजार रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी महासंघाचे अध्यक्ष भानुदास भसाळे आणि सरचिटणीस श्रीपत तांबे यांनी केली आहे.
आकृतीबंधातील १७ पदांमध्ये दुरुस्ती करा!
महापालिकेचा सेवाशर्ती व आकृतीबंध २०२२ मध्ये मंजूर झाला आहे. त्यानुसार विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याची प्रक्रिया प्रस्तावित आहे. मात्र, मंजूर आकृतीबंधातील १७ पदांमध्ये दुरुस्ती आवश्यक असून, त्यासाठीचा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला आहे. या पदांची दुरुस्ती अद्याप मंजूर झालेली नसताना पदोन्नती प्रक्रिया राबविल्यास कर्मचाऱ्यांच्या सेवाज्येष्ठता, पात्रता आणि पदोन्नतीच्या हक्कांबाबत भविष्यात प्रशासकीय अडचणी निर्माण होण्याची शक्यता महासंघाने व्यक्त केली आहे. त्यामुळे १७ पदांची दुरुस्ती सरकारकडून मंजूर होऊन सुधारित सेवाशर्ती व आकृतीबंध प्राप्त होईपर्यंत पदोन्नती प्रक्रिया स्थगित ठेवावी. तसेच सरकारी स्तरावर या दुरुस्तीला मंजुरी मिळण्यासाठी महापालिकेने पाठपुरावा करावा, अशी मागणी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.