‘प्राणी खेळणे नाहीत, मित्र आहेत!’
‘सकाळ एनआयई’च्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना वन्यजीव संवर्धनाची जाणीव
मुंबई, ता. ७ : शारदाश्रम विद्यामंदिर, मराठी प्राथमिक विभाग, दादर येथे ‘सकाळ एनआयई’ उपक्रमांतर्गत वन्यजीव सप्ताहानिमित्त ‘प्राण्यांशी मैत्री - अन्नसाखळी’ या विशेष शैक्षणिक व जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये प्राणी-पक्ष्यांविषयी प्रेम, आपुलकी, संवेदनशीलता आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
सर्पमित्र सुनील कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना कासव,बदक, कोंबडीची पिल्ले, मासे, पांढरा उंदीर, गिनीपिग, ससा, कबूतर, खेकडा, लव बर्ड्स आदी विविध प्राणी-पक्ष्यांचे जवळून निरीक्षण करण्याची संधी मिळाली. या प्राणी-पक्ष्यांची वैशिष्ट्ये, त्यांच्या सवयी, त्यांचे नैसर्गिक जीवन आणि पर्यावरणातील महत्त्व यांची माहिती विद्यार्थ्यांना सोप्या, रंजक आणि संवादात्मक पद्धतीने देण्यात आली. प्रत्यक्ष निरीक्षण आणि अनुभवातून शिक्षण मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह विशेष उल्लेखनीय होता.
या कार्यक्रमाला वनरक्षक ज्योती दीपक भोसले (दादर पश्चिम), संजीव शिंदे (मस्जिद बंदर), संदीप पाटील (मस्जिद बंदर), भाग्यश्री माळावे (दहिसर) तसेच वन्यजीव बचावकर्ता संतोष भांगणे हे मान्यवर उपस्थित होते.
शाळेचे कार्यवाह गजेंद्र शेट्टी, अध्यक्ष संभाजी मंडले, प्रशासकीय व्यवस्थापक वनजा मोहन, शाळेच्या मुख्याध्यापिका कांचन खरात याही उपस्थित होत्या. त्यांच्या उपस्थितीमुळे वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनाविषयी विद्यार्थ्यांना अधिक माहिती मिळाली.
दरवर्षी २ ते ८ ऑक्टोबर या कालावधीत साजऱ्या होणाऱ्या वन्यजीव सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर वन्यजीवांचे पर्यावरणातील महत्त्व, अन्नसाखळीतील त्यांचे स्थान, नैसर्गिक अधिवासांचे संरक्षण आणि जैवविविधतेचे संवर्धन यांविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. वाढते शहरीकरण, वृक्षतोड, प्रदूषण आणि प्लास्टिकचा वापर यांमुळे वन्यजीवांच्या अस्तित्वासमोर निर्माण होणाऱ्या धोक्यांचीही जाणीव करून देण्यात आली.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका कांचन किशोर खरात, शाळेतील सर्व शिक्षकवृंद, आयोजक आणि विशेष मेहनत घेणारे सर्पमित्र सुनील कदम यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले. पुस्तकातील ज्ञानाला प्रत्यक्ष अनुभवाची जोड देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरला.
प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे रक्षण करा!
आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांना मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या पलीकडे जाऊन निसर्गाशी प्रत्यक्ष जोडणारे उपक्रम महत्त्वाचे ठरत आहेत. ‘प्राणी हे खेळणे नाहीत, ते आपले मित्र आहेत!’ हा संदेश या कार्यक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला. प्रत्येक जीव निसर्गाच्या समतोलासाठी महत्त्वाचा असून, प्राणी-पक्ष्यांशी दयाळूपणे वागणे, त्यांना इजा न पोहोचवणे आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, याची जाणीव विद्यार्थ्यांना करून देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.