बंद सीसीटीव्ही तातडीने सुरू करा
भाजपचा नगर पंचायतीला इशारा; अन्यथा भीक मागून आंदोलन
पोलादपूर, ता. ७ (बातमीदार) : पोलादपूर नगर पंचायतीच्या हद्दीतील प्रमुख रस्ते, विविध नगर आणि महत्त्वाच्या ठिकाणी बसविण्यात आलेले अनेक सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे शहराच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, हे कॅमेरे तातडीने दुरुस्त करून कार्यान्वित करावेत, अशी मागणी भाजपच्या वतीने नगर पंचायत प्रशासनाकडे करण्यात आली.
याबाबत भाजप शहराध्यक्ष महेश निकम, तालुका सरचिटणीस आशुतोष दरेकर, तालुका उपाध्यक्ष राजेश कदम, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष दर्पण दरेकर, तालुका कोषाध्यक्ष राजेश सपकाळ, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सनी जाधव आणि नरेश शेलार यांनी नगर पंचायत प्रशासनाला निवेदन दिले. शहरातील अनेक कॅमेरे दीर्घकाळापासून बंद असल्याचे त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.
सीसीटीव्हीच्या देखभालीसाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यावर दर्पण दरेकर यांनी, “मेंटेनन्ससाठी माणूस उपलब्ध नसेल तर आम्ही भीक मागून आंदोलन करू आणि देखभालीचा खर्च करू,” असा इशारा दिला. त्यानंतर प्रशासनाने आंदोलन न करण्याचे आवाहन करत समस्या लवकर सोडविण्याचे आश्वासन दिले.
महेश निकम यांनी नागरिकांकडून विविध कर घेतले जात असताना त्यांच्या पैशातून उभारलेली यंत्रणा उपयोगात येत नसल्याबद्दल प्रश्न उपस्थित केला. चोरी, भांडण, अपघात किंवा अन्य अनुचित घटना घडल्यास तपासासाठी सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे ठरते, मात्र यंत्रणा बंद असल्याने पुरावे मिळविण्यात अडचणी येऊ शकतात, असे त्यांनी सांगितले.
प्रशासनावर जबाबदारीचा इशारा
शहरातील सर्व बंद कॅमेरे तातडीने सुरू करावेत. भविष्यात यंत्रणा बंद असल्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची प्रशासकीय जबाबदारी नगर पंचायत प्रशासनाची राहील, असा इशारा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.