मुंबई, ता. ७ : मुंबईतील बारावीपर्यंत शिक्षण देणाऱ्या रात्रशाळांमध्ये आता दुबार शिक्षकांऐवजी अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. शाळांमध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून सुरू असलेल्या प्रक्रियेत रात्रशाळांचाही समावेश करण्यात येत असून, रात्रशाळांमध्ये कार्यरत असलेल्या दुबार शिक्षकांची संख्या कमी करून त्यांच्या जागी अतिरिक्त शिक्षकांना सामावून घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
मुंबईसह राज्यातील अनेक रात्रशाळांमध्ये सध्या शिक्षकांची कमतरता जाणवत असताना दुसरीकडे नियमित शाळांमध्ये मोठ्या संख्येने शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. त्यामुळे उपलब्ध शिक्षकांचे योग्य पद्धतीने पुनर्विनियोजन करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. विशेषतः मुंबईतील बारावीपर्यंत शिक्षण देणाऱ्या रात्रशाळांमध्ये या समायोजनाला प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे. रात्रशाळांना आपल्या हक्काचे शिक्षक मिळावेत म्हणून यापूर्वी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी शालेय शिक्षण विभागाकडे पाठपुरावा केला होता.
दुबार शिक्षकांची पदे कमी होणार
रात्रशाळांमध्ये यापूर्वी दुबार शिक्षक नियुक्त करण्याची पद्धत सुरू करण्यात आली होती. दिवसा नियमित शाळेत अध्यापन करणारे शिक्षक रात्री रात्रशाळेतही अध्यापन करीत होते. मात्र, या व्यवस्थेमुळे कालांतराने शिक्षकांची संख्या आणि विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष गरज यामध्ये तफावत निर्माण झाली. त्यातून मोठ्या प्रमाणावर शिक्षक अतिरिक्त ठरण्याची परिस्थिती निर्माण झाल्याचे शिक्षण क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. आता रात्रशाळांमधील दुबार शिक्षकांची संख्या कमी करून त्यांच्या जागी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याचा निर्णय घेतला जात आहे.
विद्यार्थी वाढले; शिक्षकांची कमतरता कायम
मुंबईतील काही रात्रशाळांमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. दरम्यान, विद्यार्थीसंख्येच्या तुलनेत पुरेसे शिक्षक उपलब्ध नसल्याने अध्यापनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दिवसभर काम करून रात्री शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रात्रशाळा महत्त्वाच्या असताना शिक्षकांच्या कमतरतेचा थेट परिणाम त्यांच्या शिक्षणावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांचे रात्रशाळांमध्ये समायोजन झाल्यास एका बाजूला शिक्षकांची कमतरता दूर होईल, तर दुसऱ्या बाजूला अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्नही काही प्रमाणात मार्गी लागेल.
राज्यातील १४९ रात्रशाळांत ५४४ शिक्षक
राज्यात सध्या १४९ रात्रशाळांमध्ये ५४४ शिक्षक कार्यरत आहेत. यापैकी २०० हून अधिक शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. राज्यातील रात्रशाळांमध्ये सध्या १६ हजार ५२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांची संख्या काही ठिकाणी कमी होत असली तरी शिक्षक अतिरिक्त होण्याचे प्रमाणही मोठे आहे. त्यामुळे रात्रशाळांमध्ये शिक्षकांचे फेरनियोजन करताना विद्यार्थ्यांची संख्या, विषयांची गरज आणि शाळेची प्रत्यक्ष आवश्यकता लक्षात घेणे आवश्यक ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.