निलंबनाचा नियम शिथिल
आयआयटी मुंबईत २०१५चे जुने नियम पुन्हा लागू
मुंबई, ता. ७ : ‘बीटेक’चे शिक्षण घेणाऱ्या साहिल वाकोडे या विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर देशभरातच चर्चेत आलेल्या आयआयटी मुंबईने आता परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांकडून काही गैरप्रकार केल्याचे आढळल्यास त्या विद्यार्थ्यांना एका वर्षांसाठी निलंबित करण्याचा नियम शिथिल केला आहे. यासाठी बुधवारी (ता. ७) झालेल्या सिनेटच्या बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे.
साहिलच्या आत्महत्येनंतर या प्रकरणाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी संस्थेने स्थापन केलेल्या समितीने विद्यार्थ्यांना एका वर्षासाठी निलंबित करण्याचा नियम शिथिल करण्याची सूचना आपल्या अहवालात दिली होती. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. आयआयटीने आपल्या संस्थेच्या सिनेटची तातडीची बैठक बोलावली होती. त्या बैठकीत २०१५ मध्ये अस्तित्वात असलेले मूळ नियम पुन्हा लागू करण्यास मंजुरी देण्यात आली, तर यापूर्वी जुलै २०२६ मध्ये परीक्षेतील कॉपी किंवा अन्य गैर प्रकारांवर अधिक कठोर कारवाई करण्यासाठी नवीन नियम प्रस्तावित करण्यात आले होते. या नियमांनुसार गैरप्रकार करताना आढळलेल्या विद्यार्थ्यावर कठोर शैक्षणिक कारवाई होऊ शकत होती. त्यामध्ये एका सेमिस्टरचे निलंबन आणि परीक्षा पुन्हा देण्यासंबंधीच्या शिक्षेचा समावेश होता, मात्र आता जुन्या नियमांकडे परतण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २०१५ च्या नियमांनुसार, परीक्षेदरम्यान एखादा विद्यार्थी गैरप्रकार करताना आढळल्यास त्याला तातडीने परीक्षा संपवण्याऐवजी नवीन उत्तरपत्रिका देऊन परीक्षा पूर्ण करण्याची संधी दिली जाऊ शकते. त्यानंतर संबंधित प्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी करून पुढील कारवाई केली जाते. विद्यार्थ्याला आपली बाजू मांडण्याची संधी देणे हा या प्रक्रियेतील महत्त्वाचा भाग आहे. गैरप्रकाराच्या घटनेबाबत विद्यार्थ्याचे म्हणणे नोंदवण्यासाठी असलेला फॉर्म भरणे त्याच्यावर बंधनकारक राहणार नाही, अशी माहितीही बैठकीनंतर समोर आली आहे.
--
--
विद्यार्थ्यांनी केले स्वागत
सिनेटच्या या निर्णयामुळे आयआयटी मुंबईने विद्यार्थ्यांना निलंबित करण्याच्या कठोर शिक्षेपेक्षा त्याला आपली बाजू मांडण्याची आणि परीक्षा प्रक्रिया अधिक न्याय्य पद्धतीने पार पाडण्याची दिशा स्वीकारल्याचे आजच्या निर्णयावरून दिसून आले असून, या निर्णयाचे काही विद्यार्थी संघटनांनी स्वागतही केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.