अंगणवाडी सेविकांवर संस्कारांचीही जबाबदारी
जि. प. सदस्या मानसी दळवी यांचे प्रतिपादन
मुरूड, ता. ८ (बातमीदार) : बालकाच्या पोषणासोबतच त्याच्या आरोग्य, लसीकरण, चांगल्या सवयी आणि संस्कारांची जबाबदारीही अंगणवाडी सेविका व मदतनीस समर्थपणे पार पाडत आहेत. बालकाच्या सर्वांगीण विकासात त्यांची भूमिका महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन रायगड जिल्हा परिषद सदस्या मानसी दळवी यांनी केले.
मुरूड येथे रायगड जिल्हा परिषद एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पांतर्गत आयोजित सेवा संकल्प अभियान व पोषण महाअभियानाच्या सांगता समारंभात त्या बोलत होत्या.
बालकाच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यात प्रथिने, जीवनसत्त्वे व अन्य पोषक घटक योग्य प्रमाणात मिळणे आवश्यक आहे. आहारासोबत नियमित आरोग्य तपासणी, लसीकरण आणि योग्य सवयी लावण्यात अंगणवाडी सेविकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे दळवी यांनी सांगितले.
महिला व बालकल्याण समिती सभापती रसिका केणी यांनीही अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांसाठी ठोस पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमात अंगणवाडी सेविकांनी ‘पोषण मंगळागौरी’ सादर करून भाजीपाला, फळे, डाळी, कडधान्ये, दूध व पौष्टिक पदार्थांच्या सेवनाचा संदेश दिला. जिल्हा परिषद सदस्य विघ्नेश माळी यांनी जिजाऊंनी शिवरायांना दिलेल्या संस्कारांचा संदर्भ देत अंगणवाडी सेविकाही बालकांना योग्य दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करीत असल्याचे सांगितले. फास्ट फूड टाळून पौष्टिक आहार घेण्याचे तसेच पोषणाचा संदेश वर्षभर प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी रसिका केणी व मानसी दळवी यांच्या हस्ते अंगणवाडी मदतनिसांना नियुक्ती आदेशाचे वाटप करण्यात आले. तसेच जोरदार माता यांना पंचायत समिती सभापती निलेश घाटवळ यांच्या हस्ते बेबी केअर किटचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास पंचायत समिती उपसभापती अश्विनी जंगम, जि. प. सदस्या ज्योती नागांवकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण पाटील, गटविकास अधिकारी राजेंद्र कुमार खताळ, बालविकास प्रकल्प अधिकारी संजय शेडगे यांच्यासह विविध पदाधिकारी, अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.