किराणा बाजार व दुकाने मंडळ
पदाधिकाऱ्यांची चौकशी करा
४३ हजारांच्या लाचप्रकरणी नरेंद्र पाटील यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ८ : किराणा बाजार व दुकाने मंडळामध्ये माथाडी कामगाराच्या पुनर्नोंदणीसाठी ४३ हजार रुपयांची लाच घेताना दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले होते. मंडळाचे निरीक्षक तथा प्रभारी कार्मिक अधिकारी भरत कदम आणि सुरक्षा रक्षक विजय पवार यांचा त्यात समावेश होता. याप्रकरणी महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्स्पोर्ट आणि जनरल कामगार युनियनने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे आभार मानले आहेत, मात्र या प्रकरणात केवळ पकडण्यात आलेले कर्मचाऱ्यांना दोषी न मानता मंडळाचे चेअरमन, सचिव, निरीक्षक, कर्मचारी आणि इतर पदाधिकाऱ्यांचीही सखोल चौकशी करावी, अशी मागणी युनियनचे सरचिटणीस तथा माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी केली.
नरेंद्र पाटील यांनी यासंदर्भात गुरुवारी (ता. ८) रोजी नवी मुंबईतील एपीएमसी, तुर्भे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उपअधीक्षकांना पत्र दिले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कदम आणि पवार यांना लाच घेताना पकडले होते. या कारवाईबद्दल युनियनच्या वतीने विभागाचे अभिनंदन करण्यात आले आहे, मात्र या प्रकरणामागे मंडळाची कार्यपद्धती संशयास्पद असल्याचा दावा नरेंद्र पाटील यांनी केला. मंडळातील निरीक्षक, सचिव, चेअरमन तसेच इतर वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी या गैरव्यवहारात सहभागी असण्याची शक्यता असल्याचा आरोप त्यांनी पत्रातून केला आहे.
कामगारांची कामे वेळेत पूर्ण होणे अपेक्षित असतानाही मंडळाकडून त्यात दिरंगाई केली जात असल्याचा आरोप यात करण्यात आला आहे. एखाद्या माथाडी कामगाराने राजीनामा दिल्यानंतर रिक्त जागेवर नवीन कामगाराची नोंदणी किंवा पुनर्नोंदणी करण्याच्या प्रक्रियेतही विलंब केला जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. काही प्रकरणांत निर्णय न घेता वेळकाढूपणा केला जात असून, या विलंबामागे कामगारांकडून लाच उकळण्याचा उद्देश असल्याचा गंभीर आरोपही पाटील यांनी केला आहे. या सर्व बाबींची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गंभीर दखल घेऊन किराणा बाजार व दुकाने मंडळाचे चेअरमन, सचिव, निरीक्षक, सर्व कर्मचारी आणि इतर पदाधिकाऱ्यांची निष्पक्ष व सखोल चौकशी करावी. तसेच माथाडी कामगारांवरील अन्याय दूर करून त्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी नरेंद्र पाटील यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.