नवी मुंबईत रंगणार
वेगवान शर्यतीचा थरार
इंडियन रेसिंग फेस्टिव्हलतर्फे ५-६ डिसेंबरला नाइट-रेस फिनाले
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ८ : इंडियन रेसिंग फेस्टिव्हलने आपल्या २०२६च्या हंगामाचे पूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. या फेस्टिव्हलचा फिनाले पाम बीच रोडजवळील नवी मुंबई स्ट्रीट सर्किटवर ५ आणि ६ डिसेंबर रोजी रात्री (नाइट-रेस) आयोजित करण्यात येणार आहे. ग्रेटर नोएडा येथील बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवर रेसिंगचे दोन वीकेंड पार पडल्यानंतर अंतिम फेरीचे आयोजन केले जाणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पक्क्या रेसिंग ट्रॅकवरून थेट नवी मुंबईच्या रस्त्यांवर होणाऱ्या शर्यतीमुळे २०२६च्या हंगामाचा शेवट अतिशय रोमांचक ठरणार आहे.
परमनंट ट्रॅकच्या तुलनेत स्ट्रीट रेसिंगचा अनुभव अत्यंत वेगळा असतो. यात मोटरस्पोर्ट थेट शहराच्या केंद्रस्थानी पोहोचते आणि यजमान शहर या सोहळ्याचा एक प्रमुख भाग बनते. नाइट -रेसमुळे या थरारात आणखी भर पडते. लॉस व्हेगासमध्ये २०२३ मध्ये झालेल्या पहिल्या स्ट्रीट रेसला ३,१५,००० हून अधिक प्रेक्षकांनी हजेरी लावली होती, ज्यातून अंदाजे १.२ अब्ज अमेरिकन डॉलर्स आर्थिक फायदा झाला. त्याचप्रमाणे मोनॅको ग्रँड प्रिक्समुळे स्थानिक हॉटेल्स आणि आदरातिथ्य (हॉस्पिटॅलिटी) क्षेत्राला मोठी मागणी असते. बाकूमध्ये स्ट्रीट सर्किटच्या माध्यमातून शहरातील प्रमुख वास्तुंची आंतरराष्ट्रीय मोटरस्पोर्ट आणि पर्यटनाच्या नकाशावर वेगळी ओळख निर्माण झाली आहे. या स्ट्रीट रेसिंगमुळे खेळासोबतच पर्यटन, हॉस्पिटॅलिटी आणि संपूर्ण शहरात एकाच वेळी उत्साहाचे वातावरण निर्माण होते. चालकांसाठी (ड्रायव्हर्स) ३.६९ किलोमीटरचे हे तात्पुरते स्ट्रीट सर्किट अत्यंत आव्हानात्मक आणि शिस्तीची परीक्षा घेणारे ठरणार आहे. नवी मुंबईतील हा फिनाले इंडियन रेसिंग फेस्टिव्हलला एका पारंपरिक रेस ट्रॅकवरून थेट शहराच्या मध्यवर्ती भागात घेऊन येत असून, चाहत्यांना नाइट-रेसचा अभूतपूर्व अनुभव देणार आहे. या फिनालेपूर्वी, इंडियन रेसिंग फेस्टिव्हलच्या ४व्या आणि ५व्या फेऱ्या ग्रेटर नोएडा येथील बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवर रंगणार आहेत. ३१ ऑक्टोबर-१ नोव्हेंबर आणि २८-२९ नोव्हेंबर रोजी या फेऱ्या पार पडतील. यापूर्वी फॉर्म्युला १ इंडियन ग्रँड प्रिक्सचे आयोजन करणाऱ्या या ट्रॅकवर तब्बल १३ वर्षांनंतर ‘एफआयए’ दर्जाच्या रेसिंगचे पुनरागमन होत आहे.
--------------------------------------
बुद्ध इंटरनॅशनल सर्किट आणि नवी मुंबई या दोन्ही ठिकाणांचे नियोजन आम्ही बऱ्याच काळापासून करत होतो. अथक परिश्रमांनंतर हे स्वप्न साकार होत आहे. भारतामध्ये मोटरस्पोर्टचा आलेख वेगाने उंचावत आहे. नवी मुंबईच्या रस्त्यांवर अंतिम फेरी आयोजित करणे हे देशात मोटरस्पोर्टचा विस्तार करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. आम्हाला विश्वास आहे की यामुळे मोटरस्पोर्ट अधिक लोकांपर्यंत पोहोचेल आणि भारताला एक जागतिक मोटरस्पोर्ट हब बनवण्याच्या आमच्या ध्येयाला गती मिळेल.
- अखिलेश रेड्डी
रेसिंग प्रमोटन्स प्रायव्हेट लिमिटेड अध्यक्ष
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.