मुरूडच्या मातीत घडलेला कलावंत हरपला
नाना पाटेकर यांच्या निधनाने मुरूडवर शोककळा
मुरूड, ता. ८ (बातमीदार) : मुरूडच्या मातीत बालपण घालवलेल्या आणि याच भूमीत शालेय शिक्षण घेतलेल्या ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी समजताच मुरूडवर शोककळा पसरली. रंगभूमीपासून रुपेरी पडद्यापर्यंत आपल्या दमदार अभिनयाची छाप उमटविणाऱ्या नानांच्या जाण्याने मुरूडकरांच्या अनेक जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. पडद्यावरचा मोठा कलाकार म्हणून नव्हे, तर आपल्यातलाच एक माणूस म्हणून नानांना आठवताना अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
मुरूडच्या मातीत शिकलेला हा असामान्य कलावंत पुढे भारतीय सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने अढळ स्थान निर्माण करेल, याची कदाचित त्या काळी कुणालाही कल्पना नसेल. मात्र, त्यांच्या प्रवासात मुरूडची माती आणि तेथील माणसांचे संस्कार कायम राहिले. त्यामुळेच नानांच्या निधनाची बातमी मुरूडकरांसाठी एखाद्या आपल्याच माणसाला गमावल्यासारखी ठरली.
स्थानिक कलाकार आणि मित्रांनी नानांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. साहित्यिक, नाट्यकर्मी आणि सिने कलावंत अभय जनार्दन पैर यांनी नानांसोबतचा सुमारे चार दशकांपूर्वीचा एक प्रसंग सांगितला. दादा हणमंते, किरण बाथम आणि अन्य सहकाऱ्यांसह ते नानांना भेटण्यासाठी विभाकर दांडेकर यांच्या घरी गेले होते. दिलीप परदेशी लिखित ‘तळहातीच्या नाजूक रेषा’ या नाटकाच्या तालमीच्या शुभारंभासाठी नानांना निमंत्रण देण्यासाठी ही भेट होती. त्या वेळी नाना गाठी खात होते. निमंत्रण दिल्यानंतर त्यांनी नेहमीच्या सहजपणे, ‘कधी येऊ सांगा?’ असे विचारले. त्यावर पैर यांनी ‘साडेतीन वाजेपर्यंत मोडक सरांच्या घरी या,’ असे सांगितले. त्यावर नानांनी मिश्कीलपणे उत्तर दिले, ‘या, या म्हणालास तर नाही येणार... ये म्हणालास तर येईन... ये म्हण!’ या छोट्याशा संवादातूनही त्यांचे आपलेपण आणि माणूसपण जाणवत होते. त्या भेटीनंतर दोघांमधील संबंध अधिक जिव्हाळ्याचे झाले.
विशेष म्हणजे, नाना दिलेल्या वेळेच्या दहा मिनिटे आधीच तेथे पोहोचले होते. मोडक सर, कारखानीस बाई, मनोहर बहिले, बँक मॅनेजर ठुसे आदी मान्यवरांसमोर उशिरा आलेल्यांची आपल्या खास शैलीत खरडपट्टी काढल्यानंतर त्यांनी सुमारे दीड तास नाट्यविषयक मार्गदर्शन केले. ‘सहजता, वास्तवता आणि मेहनत’ ही कलेची त्रिसूत्री त्यांनी त्या वेळी सांगितली. चार दशकांपूर्वी नानांनी दिलेली ही शिकवण आजही आपल्या सोबत असल्याचे पैर यांनी सांगितले.
मच्छीमार संघाचे सदस्य मनोहर बैले यांनीही नानांच्या आठवणी सांगताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेगळा पैलू उलगडला. नानांचा स्वभाव रांगडा, दिलखुलास आणि पारदर्शक होता. मुरूडच्या या शालेय मित्राचे अठरा पगड जातींच्या लोकांशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. बंडखोर स्वभाव असला, तरी सर्व जाती-धर्मांतील लोकांशी त्यांची घट्ट मैत्री होती, असे बैले यांनी सांगितले. नानांसोबत कोळी बांधव पद्मदुर्ग किल्ल्यावर गेले असताना त्यांचा इतिहासाचा गाढा अभ्यास ऐकून आपण थक्क झाल्याचेही बैले यांनी सांगितले. पडद्यावर वेगवेगळ्या भूमिका साकारणारा हा अभिनेता प्रत्यक्ष आयुष्यातही आपल्या मातीशी, माणसांशी आणि इतिहासाशी जोडलेला होता, अशी आठवण त्यांनी सांगितली.
माजी नगराध्यक्ष मंगेश दांडेकर यांनीही नानांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. मुरूड-जंजिऱ्याच्या पर्यटन महोत्सवात नानांनी केलेले भाषण आयुष्यभर स्मरणात राहील, असे त्यांनी सांगितले. नानांनी मुरूडच्या मातीत शालेय शिक्षण घेतले, याचा मुरूडकरांना सार्थ अभिमान आहे. अभिनयाच्या क्षेत्रात त्यांनी मिळवलेले यश मोठे आहेच; मात्र त्याहून मोठी गोष्ट म्हणजे मुरूडच्या माणसांशी त्यांनी जपलेले नाते. त्यामुळे नानांच्या आठवणी मुरूडकरांच्या मनात कायम जिवंत राहतील, अशा भावना दांडेकर यांनी व्यक्त केल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.