पनवेलमध्ये फुलपाखरू उद्यान साकारणार!
परेश ठाकूर यांच्याकडून जागेची पाहणी
पनवेल, ता. ९ (बातमीदार) : पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे जतन आणि नागरिकांमध्ये निसर्गाविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने पनवेलमध्ये फुलपाखरू उद्यान साकारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल आणि पनवेल महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने नियोजित उद्यानाच्या जागेची पाहणी केली. या वेळी उद्यानाची संकल्पना आणि पर्यावरणपूरक उपक्रमांबाबत चर्चा करण्यात आली.
शहरीकरणाचा वेग वाढत असताना नैसर्गिक अधिवासांचे संरक्षण आणि जैवविविधतेचे जतन करण्याचे महत्त्व अधिक वाढले आहे. पर्यावरणातील महत्त्वाचा घटक असलेल्या फुलपाखरांच्या संवर्धनासाठी पोषक वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर प्रस्तावित फुलपाखरू उद्यानामुळे निसर्ग संवर्धनाला चालना मिळण्यास मदत होणार आहे.
या उद्यानात विविध प्रकारच्या फुलपाखरांना अनुकूल अधिवास उपलब्ध करून देणे, स्थानिक जैवविविधतेचे जतन करणे आणि लहान मुलांसह नागरिकांमध्ये निसर्गाविषयी आवड निर्माण करणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांसाठी हे उद्यान पर्यावरण शिक्षणाचे महत्त्वपूर्ण केंद्र ठरू शकते. फुलपाखरांचे जीवनचक्र, वनस्पतींचे महत्त्व आणि पर्यावरणातील परस्पर संबंध समजून घेण्याची संधीही येथे उपलब्ध होऊ शकते.
रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल आणि पनवेल महानगरपालिकेच्या संयुक्त प्रयत्नांतून हा उपक्रम साकारण्याच्या दृष्टीने पुढाकार घेण्यात आला आहे. या उद्यानामुळे पनवेलच्या पर्यावरणपूरक विकासाला हातभार लागेल आणि नागरिकांचे निसर्गाशी नाते अधिक दृढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
चौकट :
निसर्ग संवर्धनाचे केंद्र
प्रस्तावित फुलपाखरू उद्यान हे केवळ सुशोभीकरणापुरते मर्यादित न राहता पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधतेच्या जतनाचा संदेश देणारे केंद्र ठरणार आहे. निसर्गाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या उपक्रमामुळे पनवेलमध्ये पर्यावरणविषयक जागरूकता वाढण्यास मदत होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.