पिसे आश्रमशाळेत विद्यार्थ्याचा मृत्यू
निष्काळजीचा आरोप; अधीक्षक, प्रभारी मुख्याध्यापक निलंबित
शहापूर, ता. ९ (वार्ताहर) : भिवंडी तालुक्यातील पिसे शासकीय आश्रमशाळेत इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या विवेक सुभाष भोये (वय ११, रा. वंगणपाडा, ता. शहापूर) या विद्यार्थ्याचा शुक्रवारी (ता. ९) मृत्यू झाला. तीन दिवसांपासून तापाने आजारी असलेल्या विवेकला वेळीच योग्य वैद्यकीय उपचार मिळाले नसल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी शाळेचे अधीक्षक राहुल गजानन जवंजाळ आणि प्रभारी मुख्याध्यापक जयवंत भाऊ सापळे यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच वैद्यकीय अधिकारी, अधीक्षक आणि मुख्याध्यापक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे यांनी दिली.
शहापूर आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत पिसे शासकीय आश्रमशाळा चालविली जाते. या शाळेत विवेक पाचवीच्या वर्गात शिकत होता. तो तीन दिवसांपासून तीव्र तापाने आजारी होता. शाळेतील कर्मचाऱ्यांनी त्याला पडघा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. तेथून पुढील उपचारांसाठी अधिक सुसज्ज रुग्णालयात नेण्याची शिफारस करण्यात आली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष करून गुरुवारी पुन्हा त्याला जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला.
आदिवासी संघटनांचे ठिय्या आंदोलन
आदिवासी संघटना या घटनेनंतर आक्रमक झाल्या. शुक्रवारी (ता. ९) दुपारी शहापूर येथील आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयात प्रकल्प अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर संघटनांच्या प्रतिनिधींनी ठिय्या आंदोलन केले. संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यासह त्यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलकांनी केली.
सात दिवसांत अहवाल सादर करण्याची मागणी
राज्यस्तरीय आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. विद्यार्थ्याच्या दोन्ही वैद्यकीय तपासण्यांच्या नोंदी, औषधोपचारांची माहिती, आश्रमशाळेतील आजारपणाच्या नोंदी आणि रुग्णालयात नेण्यासंबंधीची कागदपत्रे तातडीने ताब्यात घ्यावीत, असे त्यांनी म्हटले आहे. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तातडीने प्रशासकीय कारवाई करावी, चौकशीदरम्यान पुराव्यांवर प्रभाव पडणार नाही याची दक्षता घ्यावी आणि मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत द्यावी, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. चौकशी व कारवाईचा प्राथमिक अहवाल सात दिवसांत सादर करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी पंडित यांनी केली आहे.
-----------------------------
फोटो क्रमांक 1 व 3 : प्रकल्प अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर आदिवासी संघटनांनी ठिय्या आंदोलन केले.
फोटो क्रमांक 2 : मयत विद्यार्थी विवेक सुभाष भोये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.