अमली पदार्थासह गुटख्याची तस्करी रोखा
रेल्वे मार्गांवरील तपासणी सक्षम करण्याचे नरेश म्हस्के यांचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : पश्चिम रेल्वे महामार्गावरील खासदारांची आज चर्चगेट येथील मुख्यालयात खासदार अरविंद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीला खासदार नरेश म्हस्के यांच्यासह राज्यातील विविध खासदार, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. प्रलंबित कामे पूर्ण करावीत, प्रवासी सुविधा वाढवाव्यात, महाराष्ट्रात होणारी अमली पदार्थ आणि प्रतिबंधित गुटख्याची तस्करी रोखण्यासह रेल्वे मार्गांवरील तपासणी अधिक सक्षम करावी, अशा सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी बैठकीत दिल्या.
ठाणे लोकसभा मतदारसंघातील मिरा रोड आणि भाईंदर रेल्वे स्थानकांवरील प्रलंबित कामे, अपुऱ्या सुविधा आणि वाढत्या गर्दीच्या प्रश्नांकडे खासदार नरेश म्हस्के यांनी पश्चिम रेल्वे प्रशासनाने आयोजित केलेल्या खासदारांच्या बैठकीत लक्ष वेधले. या दोन्ही स्थानकांवरील प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुकर आणि आरामदायी करण्यासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना आठ महत्त्वाच्या मागण्यांचे निवेदन दिले. रेल्वे मार्गावरून प्रवासी गाड्यांसह मालवाहतुकीचीही नियमित ये-जा होते. अशा परिस्थितीत प्रतिबंधित गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ किंवा अमली पदार्थांची बेकायदा वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यास संबंधित यंत्रणांनी तातडीने तपास करणे गरजेचे आहे. रेल्वे स्थानकांवर तपासणी करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, आधुनिक उपकरणे आणि गुप्त माहिती संकलन यंत्रणा सक्षम असणे आवश्यक आहे. केवळ स्थानकांवरील तपासणीपुरते मर्यादित न राहता, अशा प्रकारच्या तस्करीमागील पुरवठादार, वाहतूकदार आणि वितरण साखळीचा शोध घेणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे खासदार म्हस्के यांनी सांगितले.
मिरा रोड आणि भाईंदर परिसरातील लोकसंख्या झपाट्याने वाढत असून, मुंबईच्या दिशेने दररोज प्रवास करणाऱ्या नोकरदार, विद्यार्थी आणि अन्य प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे स्थानकांवरील पायाभूत सुविधा, तिकीट व्यवस्था, चढण्या-उतरण्याच्या सोयी आणि रेल्वे सेवांमध्ये सुधारणा करण्याची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर म्हस्के यांनी प्रवाशांच्या अडचणी सोडविण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे उपाययोजनांची मागणी केली.
.......................
भाईंदर स्थानकावर लिफ्टची सुविधा
भाईंदर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ३ आणि ४ वर प्रवाशांना ये-जा करताना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले आणि आजारी प्रवाशांसाठी जिन्यांचा वापर त्रासदायक ठरू शकतो. ही गैरसोय दूर करण्यासाठी संबंधित फलाटांवर सरकते जिने उभारावेत, अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली.
.......................
पाच एक्स्प्रेसना भाईंदरमध्ये थांबा
भाईंदर परिसरातील नागरिकांना लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासासाठी अधिक सोयीस्कर पर्याय उपलब्ध व्हावेत, यासाठी पाच एक्स्प्रेस गाड्यांना भाईंदर स्थानकावर थांबा देण्याची मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली. यामध्ये बांद्रा-दिल्ली एक्स्प्रेस, बांद्रा-वेरावल एक्स्प्रेस, बांद्रा-अहमदाबाद, दादर-भुज एक्स्प्रेस आणि बांद्रा-भावनगर एक्स्प्रेस यांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.