पोलिस शिपाई सुभाष घाडगे निलंबित
कैलास कॉलनी फायरिंग तपासात ‘खाकी कनेक्शन’
उल्हासनगर, ता. ९ (वार्ताहर) : उल्हासनगरच्या कैलास कॉलनीतील फायरिंग आणि जीवघेण्या हल्ल्यांच्या तपासात आरोपींचे धागेदोरे शोधताना पोलिसांना ‘खाकी कनेक्शन’ समोर आले आहे. आरोपीच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिस ठाण्यातील गोपनीय माहिती आरोपींपर्यंत पोहोचवल्याचे निष्पन्न झाले. गुन्हे शोध पथकातील पोलिस शिपाई सुभाष घाडगे यांना याप्रकरणी पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांनी निलंबित केले.
उल्हासनगर कैलास कॉलनीतील फायरिंग प्रकरणात दोन जणांचा मृत्यू आणि जीवघेण्या हल्ल्यांच्या तपासातून आरोपी आणि पोलिसातील कथित कनेक्शन उघड झाल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. हिललाइन पोलिसांनी तपासादरम्यान, आरोपी दीपक ठाकूरच्या परिसरातील ११ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे डीव्हीआर जप्त करून व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंगची पाहणी केली. त्यामध्ये तत्कालीन हिललाइन आणि सध्या मध्यवर्ती पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस शिपाई सुभाष वामन घाडगे हे मध्यरात्री दीपक ठाकूरच्या ‘के. सी. ग्रुप’ कार्यालयात जाऊन आरोपी दीपक ठाकूर, सुभाष कोळी आणि त्यांच्या साथीदारांना भेटत असल्याचे निष्पन्न झाले.
तसेच घाडगे यांनी दाखल गुन्हे, अटक आरोपींची चौकशी, आरोपीना चौकशीदरम्यान होणारी मारहाण तसेच मध्यवर्ती, हिललाइन आणि विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यांतील अधिकारी-अंमलदारांच्या कामकाजासह गोपनीय व वैयक्तिक माहिती आरोपींना पुरवल्याचा गंभीर ठपकाही ठेवण्यात आला आहे. या माहितीचा वापर पोलिसांविरोधात स्थानिक यूट्युब चॅनेलवर बातम्या प्रसारित करून अधिकारी-कर्मचाऱ्यांवर दबाव निर्माण करण्यासाठी होत असल्याचे आदेशात नमूद आहे. या गैरवर्तनामुळे पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांनी सुभाष घाडगे यांना निलंबित केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.