ठाण्यात गुन्हेगारीविरोधात सर्वपक्षीय एल्गार!
पूर्णेकर हत्येच्या निषेधार्थ जनमोर्चा; ‘भयमुक्त ठाणे’साठी राजकीय पक्ष एकवटले
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ शुक्रवारी (ता. ९) विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येत ‘भयमुक्त ठाणे’साठी जनमोर्चा काढला. आरोपींना अटक करून पूर्णेकर कुटुंबाला न्याय द्यावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. विविध पक्षांचे झेंडे, निषेधाचे फलक आणि घोषणांनी महापालिका मुख्यालय परिसर गजबजून गेला.
महापालिका मुख्यालयात शुक्रवारी सायंकाळपासूनच राजकीय कार्यकर्त्यांची गर्दी जमू लागली. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख केदार दिघे, माजी खासदार राजन विचारे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड, शहराध्यक्ष मनोज प्रधान, मनसेचे अविनाश जाधव, काँग्रेसचे राहुल पिंगळे आणि धर्मराज्य पक्षाचे राजन राजे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी मोर्चात सहभागी झाले. कार्यकर्त्यांच्या हातातील ‘प्रदीप पूर्णेकर अमर रहे’, ‘पूर्णेकर कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे’ आणि ‘आरोपींना अटक करा’ या संदेशांचे फलक लक्ष वेधून घेत होते. सायंकाळी साडेपाच वाजता मोर्चाला सुरुवात झाली. पूर्णेकर यांचे पुत्र राम, त्यांचे भाऊ जयनाथ पूर्णेकर आणि कुटुंबातील सदस्य मोर्चात सहभागी झाले होते. घोषणांच्या माध्यमातून हत्येचा निषेध नोंदवत गुन्हेगारीविरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. काही कार्यकर्त्यांनी कोळी-आगरी पद्धतीच्या टोप्या परिधान केल्या होत्या. पूर्णेकर आगरी समाजाचे असल्याने त्यांना न्याय मिळावा या भूमिकेतून भाजपचे काही स्थानिक कार्यकर्तेही सहभागी झाले होते.
महापालिका मुख्यालयातून निघालेला मोर्चा अल्मेडा रोड, एल. बी. एस. रोड, एल. टी. रोड आणि टेंभी नाका परिसरातून पुढे जात सिव्हिल रुग्णालयामार्गे पॅव्हेलियन हॉटेलजवळ समाप्त झाला. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मुख्यालय परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला होता.
........................
जमील शेख कुटुंबीयांची मोर्चात उपस्थिती
राबोडीत पाच वर्षांपूर्वी हत्या झालेल्या मनसेच्या जमील शेख यांच्या कुटुंबीयांनीही मोर्चात उपस्थिती लावली. ‘जस्टिस फॉर जमील शेख’ असे फलक घेऊन त्यांनी आपल्या प्रकरणातील न्यायाच्या मागणीकडे लक्ष वेधले. त्यामुळे हा मोर्चा केवळ एका हत्येच्या निषेधापुरता मर्यादित न राहता शहरातील गुन्हेगारी आणि न्यायप्रक्रियेच्या प्रश्नांवर आवाज उठवणारा ठरला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.