अखेर सायन पुलाची एक मार्गिका खुली
दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर धारावीकरांना दिलासा; चेंबूर, दादरच्या दिशेचा पूल अद्याप बंद
धारावी, ता. ११ (बातमीदार) : मध्य रेल्वेवरील सायन स्थानकासमोरील १५० वर्षे जुना वाहतूक पूल धोकादायक झाल्याने दोन वर्षांपूर्वी नूतनीकरण करण्यासाठी बंद करण्यात आला होता. यामुळे धारावीतून चेंबूर, दादर व कुर्ला या दिशेला वाहने जाऊ शकत नव्हती. अनेकदा रेल्वे प्रशासनाने व पालिकेने पूल चालू करण्याच्या विविध तारखा जाहीर केल्या होत्या. त्या तारखेला पूल खुला होत नसल्याने स्थानिक रहिवासी संताप व्यक्त करत होते. काही दिवसांपूर्वी आंदोलने करण्यात आली होती. याची दखल घेत पुलाचा एक भाग नुकताच खुला करण्यात आला आहे.
सायन स्थानकासमोरील पश्चिमेला असलेल्या लाल बहादूर शास्त्री मार्गाहून कुर्ला पश्चिमेकडे जाणाऱ्या पुलाचा एक भाग चालू करण्यात रेल्वे व पालिका प्रशासनाला यश आले आहे. पुलावरील एक मार्गिका तरी खुली झाली यामुळे धारावीतील रहिवासी समाधान व्यक्त करत आहेत. कोणत्याही उद्घाटनाची वाट न पाहता मार्गिका खुली झाल्याने धारावीतून किमान कुर्ला दिशेला का होईना जाण्यास मिळू शकते. यामुळे स्थानिक रहिवाशांनी निःश्वास सोडला आहे.
रेल्वे व पालिका अधिकाऱ्यांनी किमान एक मार्गिका खुली करण्यास प्राधान्य दिले हे खूपच चांगले झाले. आता लवकरात-लवकर चेंबूर व दादरच्या दिशेने जाणारा मुख्य वाहतूक पूलसुद्धा वेगाने पूर्ण करून खुला होईल, अशी आशा ज्येष्ठ समाजसेवक प्रफुल शिंदे यांनी व्यक्त केली, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखा अध्यक्ष संदीप कदम यांनी वाहतूक पूल चालू केला जावा यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे सांगत यासाठी रेल्वे व पालिका प्रशासनासोबत सामन्व्यय साधत असल्याचे सांगितले.
आम्ही काही दिवसांपूर्वी धारावी बचाव आंदोलन तर्फे पुलाचे काम लवकरात-लवकर पूर्ण करून पूल खुला केला जावा, यासाठी आम्ही जनतेला घेऊन जोरदार निदर्शने केली होती. त्याचा दणका बसल्याने एक मार्गिका खुली झाली असल्याची प्रतिक्रिया आंदोलनाचे नेते माजी आमदार बाबुराव माने यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.