सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : जिल्ह्यातील शैक्षणिक सुविधा, प्राथमिक आरोग्यसेवा आणि नागरी सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक विकास आराखडा तयार केला आहे. जिल्हा परिषद, महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रांतील शाळांच्या भौतिक व शैक्षणिक सुविधांच्या विकासासाठी सुमारे ३०० कोटी, तर प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या दर्जावाढीसाठी सुमारे १०० कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यासोबतच शहरांचे सौंदर्यीकरण, सार्वजनिक सुविधांचे सक्षमीकरण, महिला सक्षमीकरण तसेच दलित वस्ती आणि झोपडपट्टी परिसरातील मूलभूत सुविधांच्या विकासावर भर देण्यात येणार आहे.
जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची (दिशा समिती) ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच आढावा बैठक पार पडली. या वेळी खासदार, दिशा समितीचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या निर्देशानुसार हा सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यातील शाळांचा भौतिक आणि शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी डिजिटल शिक्षण सुविधा, इंटरनेट जोडणी, आधुनिक व सुसज्ज वर्गखोल्या, आदर्श स्वयंपाकगृहे, मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे आणि विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.
दर्जेदार विश्रांतीगृहांची सुविधा
सक्षम शाळा अभियानांतर्गत शाळांच्या आवश्यकतेनुसार पुनर्बांधणी करून स्मार्ट शाळा विकसित करण्यात येणार आहेत. शाळांच्या परिसरात सौरऊर्जा प्रकल्प, पावसाच्या पाण्याचे संकलन, विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार विश्रांतीगृहे तसेच शैक्षणिक आणि प्रेरणादायी चित्रांनी सजविलेल्या भिंती अशा सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पंतप्रधान पोषणशक्ती निर्माण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करीत विद्यार्थ्यांना दर्जेदार भोजन मिळावे, यासाठी आदर्श स्वयंपाकगृहांच्या उभारणीवर भर देण्याच्या सूचना खासदार डॉ. शिंदे यांनी दिल्या आहेत.
अनुभवी शिक्षकांचे सहकार्य
शाळांमधील शैक्षणिक गुणवत्तेत सातत्याने सुधारणा घडवून आणण्यासाठी शहरातील अनुभवी शिक्षकांसह शासकीय आणि खासगी क्षेत्रातील शिक्षकांचे सहकार्य घेण्याचे नियोजन आहे. प्रत्येक शाळेची अद्ययावत माहिती ठेवणे, दरवर्षी शाळांचे मूल्यमापन करणे आणि त्यानुसार आवश्यक सुधारणा करणे, यावर भर देण्यात येणार आहे. जिल्हा परिषद, महापालिका आणि नगर परिषदांच्या माध्यमातून आवश्यक निधीची उभारणी करून शाळांच्या आधुनिकीकरणाची कामे नियोजित पद्धतीने पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
एकाच छताखाली आरोग्यसेवा
आरोग्य क्षेत्रासाठी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा दर्जा उंचावण्यासाठी सुमारे १०० कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रे केवळ प्राथमिक तपासणीपुरती मर्यादित न राहता नागरिकांना एकाच छताखाली आवश्यक आरोग्य तपासण्या, उपचार आणि मूलभूत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणारी सक्षम केंद्रे म्हणून विकसित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच वैद्यकीय सेवांचा दर्जा सुधारण्याच्या सूचना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी संबंधित विभागाला दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.