टीबीमुक्त रायगडसाठी ‘जोश’ उपक्रम
८० स्वयंसेवकांची नोंदणी; जनसहभागातून क्षयरोग निर्मूलनावर भर
अलिबाग, ता. ११ (वार्ताहर) : क्षयरोगमुक्त भारताच्या उद्दिष्टपूर्तीसाठी केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या ‘जोश’ उपक्रमाला रायगड जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. शुक्रवारी (ता. ९) या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी २० वर्ग-१ अधिकारी आणि ८० स्वयंसेवकांची ‘जोश टीम’मध्ये नोंदणी करण्यात आली. जनजागृती, लोकसहभाग आणि स्वयंसेवकांच्या माध्यमातून क्षयरोग निर्मूलनाच्या प्रयत्नांना बळ देण्यावर भर देण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष किशन जावळे यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विविध शासकीय विभाग आणि पंचायतराज संस्थांच्या प्रतिनिधींना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मनीषा चव्हाण, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील आणि शिक्षणाधिकारी रेश्मा साळुंके यांच्या समन्वयातून शैक्षणिक संस्था आणि संबंधित विभागांपर्यंत उपक्रमाची माहिती पोहोचविण्यात आली.
जिल्ह्यातील विविध ठिकाणी क्षयरोगाविषयी जनजागृती करण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांना टीबी निर्मूलनासाठी योगदान देण्याची शपथ देण्यात आली. अधिकाधिक नागरिकांनी ‘टीबीमुक्त भारत’ ॲपद्वारे ‘जोश टीम’मध्ये नोंदणी करून या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. या अभियानाच्या यशस्वितेसाठी जिल्हा पीपीएम समन्वयक दंतराव सतीश, डॉ. सुरेश ठोकळ आणि डॉ. अक्षयराज राठोड यांनी विशेष प्रयत्न केले.
‘निक्षय मित्र’ बनून रुग्णांना आधार द्या
टीबीमुक्त रायगडचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केवळ जनजागृती पुरेशी नसून क्षयरुग्णांना उपचार पूर्ण करण्यासाठी सामाजिक आणि पोषणविषयक आधार मिळणेही महत्त्वाचे आहे. ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेतील पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी आपल्या गावातील रुग्णांच्या उपचारांकडे लक्ष द्यावे. ‘निक्षय मित्र’ म्हणून पुढाकार घेऊन रुग्णांना फूड बास्केटचे वाटप करावे, उपचार पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित करावे आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आवश्यक आर्थिक तरतूद करावी, असे आवाहन करण्यात आले. लोकप्रतिनिधी, स्वयंसेवक आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागातून क्षयरुग्णांना मदत मिळवून देणे आणि क्षयरोग निर्मूलनाची मोहीम अधिक प्रभावी करणे शक्य होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.