उल्हासनगर, ता. १२ (वार्ताहर) : चोरीच्या गुन्ह्यांत मुलाची ‘चाळीशी’, वडिलांची ‘सेंच्युरी’, तर मामाची ‘पंचविशी’! गुन्हेगारीची धक्कादायक कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या मंचेकर टोळीचा उल्हासनगर गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. तब्बल ४३ गुन्हे दाखल असलेल्या दिनेश मंचेकरला नवी मुंबईतून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्याच्याकडून २० तोळे सोने हस्तगत करण्यात आले. फरार वडील आणि मामाचा शोध सुरू आहे.
मुंबई महानगर परिसरात चोरीच्या गुन्ह्यांनी पोलिसांची डोकेदुखी वाढविणाऱ्या दिनेश मंचेकर (३७) याला उल्हासनगर गुन्हे शाखेने नवी मुंबईतून अटक केली आहे. त्याच्याविरोधात मुंबई, नवी मुंबई, घाटकोपर, ठाणे आणि पनवेल परिसरात तब्बल ४३ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. बदलापूरमधील चोरीच्या गुन्ह्यानंतर वर्षभरापासून पोलिस त्याच्या मागावर होते. विशेष म्हणजे, दिनेशचे वडील बाबू मंचेकर (६४) यांच्यावर सुमारे १००, तर मामा सुदेश महादेव (५२) यांच्यावर २५ गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. हे तिघे संगनमताने चोरीच्या घटना घडवत असल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्यामुळे एकाच कुटुंबातील तिघांवर मिळून १६८ गुन्हे दाखल असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. अटकेतील दिनेशकडून २० तोळे सोने हस्तगत केले आहेत. त्याचा अन्य चोरीच्या घटनांशी संबंध तपासला जात आहे. दरम्यान, फरार वडील आणि मामाच्या शोधासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. या टोळीने आणखी किती चोरीच्या घटना घडविल्या, याचा शोध गुन्हे शाखेकडून घेतला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.