फुलबाजारात दरांचा फुलोरा
नवरात्रीत अबोली, मोगरा कडाडला; झेंडू कोमेजला
जीवन तांबे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ ः नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवसापासून दादरच्या फुलबाजारात खरेदीसाठी ग्राहकांची लगबग वाढली आहे. देवीच्या पूजेसाठी आणि सजावटीसाठी अबोली, मोगरा, झेंडू आणि शेवंती या फुलांना मोठी मागणी असून, अबोली आणि मोगऱ्याच्या दरांनी दोन हजारांच्या वर उसळी घेतली आहे. देवीच्या वेण्या, गुलाबाच्या वेण्या आणि आकर्षक फुलांच्या हारांना ग्राहकांकडून पसंती मिळत आहे.
दादरच्या फुलबाजारात नवरात्रोत्सवानिमित्त पहाटेपासूनच फूलखरेदी-विक्रीची लगबग सुरू झाली आहे. जुन्नर, नाशिक, सांगली, सातारा आणि कोल्हापूरसह राज्याच्या विविध भागांतून बाजारात फुलांची आवक होत आहे. घाऊक आणि किरकोळ विक्रीसाठी व्यापारी सज्ज झाले असून, देवीच्या पूजेसाठी आवश्यक असलेल्या फुलांसह सजावटीच्या साहित्यालाही मागणी वाढली आहे.
नवरात्रोत्सवात देवीला फुले अर्पण करण्याची परंपरा असल्याने या काळात फुलांच्या विक्रीत वाढ होते. अबोली, मोगरा, झेंडू आणि शेवंती या फुलांना ग्राहकांची विशेष पसंती मिळत आहे. त्याचबरोबर देवीच्या सजावटीसाठी मोठ्या देवीच्या वेण्या, गुलाबाच्या वेण्या आणि विविध प्रकारच्या फुलांच्या माळांची खरेदी केली जात आहे.
गणेशोत्सवाच्या काळात चांगला व्यवसाय झाल्यानंतर आता नवरात्रोत्सवातही मोठी उलाढाल होण्याची अपेक्षा फूल व्यापाऱ्यांना आहे. पावसाचा जोर कमी असल्याने फुलांची आवक सुरळीत सुरू असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. नवरात्रोत्सवाचे पुढील दिवस आणि गर्दी वाढण्याच्या काळात फुलांची मागणी आणखी वाढेल, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
झेंडू कोमेजला
फुलबाजारात झेंडूला सध्या मागणी नाही. गणपतीच्या काळात किलोमागे अडीचशेच्या वर गेलेला झेंडू आता ३०-४० रुपये किलोवर आला आहे. दसऱ्यापर्यंत झेंडूचे दर वाढण्याची दाट शक्यता आहे, पण परतीचा पाऊस अधिक कोसळल्यास काही खरे नाही, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
नवरात्रोत्सव हा फुलांच्या व्यवसायासाठी महत्त्वाचा काळ आहे. सणामुळे फुलांची मागणी वाढली असून, घाऊक बाजारातही खरेदीसाठी व्यापाऱ्यांची लगबग सुरू आहे. आवक आणि मागणी यांचा समतोल राहिल्यास ग्राहकांना योग्य दरात फुले उपलब्ध होतील.
- वनिता तायडे, फूलविक्रेत्या
नवरात्रोत्सवात घरातील देवीची सजावट करण्यासाठी रंगीबेरंगी फुलांचा वापर होतो. फुलांचे दर वाजवी राहिले तर सर्वसामान्यांना सणाचा आनंद घेता येईल.
- तन्वी चव्हाण, ग्राहक
फुलबाजारातील दर, प्रतिकिलो
अबोली - २ हजार रुपये
मोगरा (वसई) - २ हजार रुपये
शेवंता - २४० रुपये
जाडी शेवंती - १२०
मोठी देवी वेणी, एक नग -२५० रुपये
कोळी वेणी, एक नग ५०० रुपये
गुलाब वेणी ( एक नग) १५० रुपये
अबोली वेणी ( एक नग) ५०० रुपये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.