नेरूळमध्ये शालेय बसचा अडथळा
रस्ता व्यापल्याने कोंडी; नागरिकांची कारवाईची मागणी
जुईनगर, ता. १२ (बातमीदार) : नेरूळहून जुईनगरकडे जाणाऱ्या मार्गावरील सेक्टर २ व ४ मधील इस्टर्न गॅलरीसमोर शालेय बस उभ्या केल्या जात असल्याने वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्याच्या निम्म्याहून अधिक भागात बस उभ्या राहत असल्याने वाहनचालकांना ये-जा करताना कसरत करावी लागत आहे. विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढला असून, संबंधित बसचालकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
नेरूळ आणि जुईनगरला जोडणाऱ्या या मार्गावर दिवसभर वाहनांची वर्दळ असते, मात्र इस्टर्न गॅलरीसमोरील रस्त्यावर शालेय बस उभ्या राहत असल्याने रस्त्याची उपलब्ध जागा कमी होते. एकाच वेळी दोन्ही दिशांनी वाहने आल्यास मार्ग काढणे कठीण होते. विशेषतः वळणावर समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज घेताना चालकांची तारांबळ उडते. त्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
या रस्त्यालगत शिरवणे विद्यालय आणि सारस्वत बँक असल्याने विद्यार्थी, पालक, बँकेतील खातेदार आणि स्थानिक नागरिकांची मोठी वर्दळ असते. शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळी बस आणि पालकांच्या वाहनांमुळे परिस्थिती अधिक गंभीर होते. रस्त्यावरून पायी चालणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
शालेय बससाठी पर्यायी पार्किंगची व्यवस्था करावी आणि वाहतुकीला अडथळा होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बसचालकांना समज देण्याबरोबरच आवश्यकतेनुसार दंडात्मक कारवाई करावी, अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे.
संभाव्य अपघात टाळण्यासाठी शाळा प्रशासन, वाहतूक पोलीस आणि महापालिकेच्या संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून रस्त्यावरील अडथळे दूर करावेत. तसेच भविष्यात अशी समस्या निर्माण होऊ नये, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
महत्त्वाची माहिती
समस्या : इस्टर्न गॅलरीसमोर रस्त्यावर शालेय बस उभ्या केल्या जातात.
परिणाम : रस्त्याची जागा कमी होऊन वाहतुकीला अडथळा निर्माण होतो.
धोका : समोरासमोर वाहने आल्यास अपघाताची शक्यता वाढते.
वर्दळीची ठिकाणे : शिरवणे विद्यालय आणि सारस्वत बँक.
नागरिकांची मागणी : पर्यायी पार्किंग, बसचालकांवर कारवाई आणि कायमस्वरूपी वाहतूक व्यवस्था.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.