आगामी ग्रामपंचायत निवडणुकांचा रणसंग्राम
गावागावात भावी सरपंचांचा सुळसुळाट
उरण, ता. १२ (वार्ताहर) : राज्यात आगामी ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजण्यास सुरुवात होणार असून, ग्रामीण भागातील राजकीय वातावरण आतापासूनच तापू लागले आहे. चावडी, पानटपरीपासून ते सोशल मीडियाच्या भिंतींपर्यंत फक्त आणि फक्त निवडणुकांचीच चर्चा पाहायला मिळत आहे. मात्र, या राजकीय गदारोळात गावातील रस्ते, पिण्याचे पाणी, विजेची समस्या आणि आरोग्यासारखे मूलभूत प्रश्न मात्र नेहमीप्रमाणे ऐरणीवर आले आहेत.
गावकऱ्यांना लोटांगण घालण्याचा धडाका
निवडणुकीची प्रभागरचना आणि आरक्षण सोडत जाहीर होताच गावागावात भावी सरपंचांची नवी फळी सक्रिय झाली आहे. कालपर्यंत गावकऱ्यांकडे साधे अवाक्षर न काढणारे इच्छुक उमेदवार आता गल्लीबोळात पुढे पुढे करताना दिसत आहेत.
भल्या पहाटेपासून घरोघरी हजेरी
लग्नसराई असो, बारसे असो गणेशोत्सव वा कोणाचा दुःखद प्रसंग; भावी सरपंच हात जोडून सर्वात आधी हजर राहताना दिसतात.
सोशल मीडियावर डिजिटल कणव, फेसबुक, व्हॉट्सॲपवर शुभेच्छांचे डिजिटल बॅनर आणि भावी सरपंचांचे समाजोपयोगी कार्याचे दावे करणारे फोटो व्हायरल होत आहेत.
चहा-नाश्त्यावर उधळपट्टी
हॉटेल्स आणि पानटपऱ्यांवर भावी सरपंचांकडून मतदारांना खूश करण्यासाठी चहा, नाश्ता आणि पार्ट्यांचे बेत आखले जात आहेत.
जनतेच्या समस्या मात्र जैसे थे
एकीकडे भावी सरपंचांचे पुढे पुढे करणे सुरू असले तरी दुसरीकडे गावातील नागरिक मूलभूत सुविधांच्या अभावामुळे त्रस्त आहेत. निवडणुका जवळ येताच काही इच्छुकांकडून नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अचानक भेटीगाठी वाढल्या आहेत. सामाजिक कार्यक्रम, गावातील विविध उपक्रम आणि नागरिकांच्या अडचणींमध्ये सहभाग घेऊन जनतेच्या जवळ जाण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळे निवडणूक जवळ आली की जनतेच्या समस्या का आठवतात, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
नागरिकांना हवा विकासाचा ठोस आराखडा
भावी सरपंच म्हणून पुढे येणाऱ्या उमेदवारांनी केवळ आश्वासने न देता गावच्या विकासाचा ठोस आराखडा मांडावा, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. निवडणुकीच्या काळात दिलेली आश्वासने प्रत्यक्षात किती उतरतात, यावरच आगामी काळात जनतेचा विश्वास अवलंबून राहणार आहे. निवडणुकीपूर्वीची आश्वासने नव्हे, तर प्रत्यक्ष केलेली विकासकामे पाहूनच योग्य प्रतिनिधी निवडू, अशी भूमिका अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.