मुंबई

घणसोलीच्या चाळीतून राष्ट्रीय पदकाचा वेध!

CD

घणसोलीच्या चाळीतून राष्ट्रीय पदकाचा वेध!
महापालिका शाळेतील ‘रायफल क्वीन नवदुर्गा’ नूतन चौधरीचा प्रेरणादायी संघर्ष
सुजित गायकवाड ः सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १२ : नवरात्रीच्या पावन पर्वात आपण शक्ती, धैर्य आणि संयमाची पूजा करतो; पण खऱ्या अर्थाने या गुणांचे दर्शन घडवणारी आजच्या युगातील नवदुर्गा आपल्याच आसपास घडताना दिसते. नवी मुंबईतील घणसोली गावठाणातील एका चिंचोळ्या चाळीत राहणारी आणि महापालिकेच्या शाळेत शिकणारी नूतन चौधरी हिचा प्रवास असाच मनाला नवी ऊर्जा देणारा आहे. अत्यंत खडतर परिस्थिती, कुटुंबात चार भावंडे आणि वडिलांची तुटपुंजी कमाई अशा परिस्थितीतही नूतनने हातात १० मीटर एअर रायफल धरून राष्ट्रीय पातळीपर्यंत मजल मारली आहे.
नूतनचे प्राथमिक शिक्षण नवी मुंबई महापालिकेच्या घणसोली येथील शाळा क्रमांक ४२ मध्ये आठवीपर्यंत झाले. नववीमध्ये शाळा क्रमांक १०५ मध्ये प्रवेश घेतल्यानंतर तिच्या आयुष्याला अनपेक्षित वळण मिळाले. संपूर्ण नवी मुंबईतील महापालिका शाळांमधून १४६ विद्यार्थ्यांची रायफल शूटिंगसाठी निवड चाचणी झाली. तीन खडतर टप्प्यांतून नूतनची निवड झाली. रायफलची माहिती नसलेल्या नूतनला सुरुवातीला हातात रायफल देऊन १० गोळ्या चालवण्यास दिल्या असता, त्यापैकी तब्बल सहा गोळ्या थेट निशाण्यावर लागल्या. पहिल्याच प्रयत्नात मिळालेल्या या यशाने तिच्यात या खेळाविषयी प्रचंड आवड निर्माण केली. सुरुवातीला सरावादरम्यान निशाणा चुकायचा, इतर मुली हसायच्या; पण हार मानणे नूतनच्या रक्तामध्येच नव्हते. वाशी येथील फादर ॲग्नेल क्रीडा संकुलातील प्रशिक्षकांनी तिला मोलाचे मार्गदर्शन आणि पाठबळ दिले. रोजच्या कठोर सरावानंतर एका वर्षाने तिला ‘पिप साईट’ रायफल देण्यात आली. एकाच पोझिशनमध्ये तासन्तास उभे राहून एकाग्रता साधणे हे आव्हानात्मक असते. यासाठी नूतन रोज एक तास शारीरिक व्यायामासह (वर्कआऊट) आठवड्यातून एकदा ध्यानधारणा (मेडिटेशन) आणि श्वासावर नियंत्रण ठेवण्याचा सराव करते. आज ती एक तास १५ मिनिटांत ६० गोळ्या अचूक निशाण्यावर मारण्याचे कसब लीलया पेलते. एका खोलीच्या चाळीतून निघून अचूक निशाणा साधत देशाच्या क्रीडा क्षितिजावर चमकू पाहणारी नूतन चौधरी ही खऱ्या अर्थाने संघर्ष, निष्ठा आणि जिद्दीची मूर्तिमंत ‘नवदुर्गा’ ठरली असून, इतर अनेक मुलींची ती प्रेरणा बनली आहे.

एक एक रुपया वाचवून पॅलेट्ससाठी धडपड
नूतनचे कुटुंब सर्वसामान्य आहे. घरात आई-वडील, दोन मोठ्या बहिणी आणि एक भाऊ असून, नूतन सर्वात लहान आहे. वडील एका खासगी कंपनीत नोकरी करतात, तर आई गृहिणी आहे. घराची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही कुटुंबाने मुलांच्या शिक्षणात कोणतीही हयगय केली नाही. सर्व भावंडांनी महापालिकेच्या शाळेतच शिक्षण घेतले असून, दोन्ही मोठ्या बहिणी आज अभियांत्रिकीचे (इंजिनिअरिंग) शिक्षण घेत आहेत. नूतनला रोजच्या प्रवासासाठी घरातून १०० रुपये मिळतात. चांगल्या सरावासाठी दर्जेदार पॅलेट्स खरेदी करता यावेत म्हणून नूतन या १०० रुपयांतून पैसे वाचवते.

महापालिकेचा भक्कम आधार आणि यशाची शिखरे
एअर रायफल शूटिंग हा अत्यंत महागडा खेळ मानला जातो. मात्र, नवी मुंबई पालिकेने नूतनच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत रेंज, रायफल, पॅलेट्स, जॅकेट, ट्राऊजर आणि शूज हे सर्व महागडे साहित्य पुरवले आहे. तिच्या सरावावर महापालिकेकडून महिन्याला सुमारे ५० हजार रुपयांपर्यंतचा खर्च केला जातो. या जोरावर नूतनने विभागीय स्तरावर कांस्यपदक, तर तीन वर्षांत डीएसओ स्पर्धेत दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदक पटकावले. आतापर्यंत राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत तीन वेळा महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नूतनचा आता नॅशनल ट्रायल्ससाठी सराव सुरू आहे.

माझा संपूर्ण सराव नवी मुंबई महापालिकेच्या खर्चामुळे शक्य होत असून, हा माझ्यासाठी खूप मोठा आधार आहे. महापालिकेचे आणि देशाचे नाव जगात पोहोचवणे हेच माझे ध्येय आहे. राष्ट्रीय ट्रायल्समध्ये सुवर्णपदक मिळवून आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र होणे आणि भारतासाठी सुवर्णपदक जिंकणे हे अंतिम स्वप्न आहे.
- नूतन चौधरी, रायफल शूटिंग खेळाडू

Sri Lanka Politics: आधी मुलगा, आता पत्नी अडचणीत; महिंदा राजपक्षे ICU मध्ये, श्रीलंकेत सध्या काय घडतंय?

'त्या'व्हायरल व्हिडीओवर अखेर गौतमी पाटील बोलली, म्हणाली... 'लाज नाही वाटली?'

Latest Marathi News Live Update : काँग्रेस दिशाहीन, किरेन रिजिजू यांची टीका

Mumbai News: जीटीबीनगरवासीयांना भाड्याचा दिलासा! निवासींना २० तर गाळेधारकांना १० हजार रुपये

Pachod News : दावरवाडी परिसरातील सहा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रेच पडलीत आजारी!

SCROLL FOR NEXT