‘मरण आले तरी चालेल, पण जमिनी देणार नाही!’
भूसंपादनाविरोधात प्रांताधिकारी कार्यालयावर शेतकरी धडकणार
पनवेल, ता. १२ (बातमीदार) ः अतिरिक्त तळोजा औद्योगिक क्षेत्र टप्पा क्रमांक २ साठी प्रस्तावित केलेल्या भूसंपादनाविरोधात परिसरातील शेतकरी अत्यंत आक्रमक झाले आहेत. मौजे महोदर, चिंचवली आणि चिंध्रण येथील खासगी जमिनींच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांनी कडाडून विरोध दर्शविला असून, आपल्या हक्काच्या जमिनी वाचविण्यासाठी हा आपला शेवटचा लढा असल्याचे शेतकऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याविरोधात आगामी १६ ऑक्टोबरला हजारो शेतकरी प्रांताधिकारी कार्यालयावर धडक देणार आहेत.
महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१च्या कलम ३२(२) अन्वये प्रस्तावित भूसंपादनाची अधिसूचना १५ जुलैला प्रसिद्ध करण्यात आली. या प्रक्रियेच्या अनुषंगाने संबंधित शेतकऱ्यांना वैयक्तिक नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनी २ सप्टेंबरला दाखल केलेल्या हरकतींवर १६ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यालयात सुनावणी आयोजित केली आहे.
या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या हरकती आणि मागण्या प्रशासनासमोर मांडणार आहेत. त्यामुळे १६ ऑक्टोबरची सुनावणी महत्त्वपूर्ण ठरणार असून, प्रशासन शेतकऱ्यांच्या हरकतींवर कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
पुढील पिढ्यांच्या भविष्याचा आधार
शासनाने जबरदस्तीने जमिनींचे भूसंपादन करू नये, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. जमिनी हा केवळ उत्पन्नाचा स्रोत नसून, अनेक शेतकरी कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा आणि पुढील पिढ्यांच्या भविष्याचा आधार आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. ‘मरण आले तरी बेहत्तर, पण आमच्या जमिनी एमआयडीसीला देणार नाही,’ असा निर्धार व्यक्त करीत शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या जमिनी वाचविण्यासाठी संघर्षाची भूमिका घेतली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.