समुद्रकिनारी सुरक्षेला प्राधान्य
पर्यटकांच्या बचावासाठी गस्त वाढविणार; पर्यटनमित्र नियुक्तीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश
अलिबाग, ता. १२ (वार्ताहर) : श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर समुद्रकिनारी आळंदी येथील आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेनंतर रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवरील पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री भरत गोगावले यांनी सोमवारी (ता. १२) जिल्हाधिकारी कार्यालयात विविध शासकीय यंत्रणांची आढावा बैठक घेतली. समुद्रकिनाऱ्यांवर पोलिस आणि होमगार्डची गस्त वाढविणे, धोकादायक ठिकाणी सूचनाफलक लावणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
या बैठकीला आमदार महेंद्र दळवी, रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष मधुकर पाटील, शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलिस अधीक्षक आंचल दलाल, अपर जिल्हाधिकारी सचिन ढोले आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक उपस्थित होते.
गर्दीच्या ठिकाणी विशेष दक्षता
रायगड जिल्ह्यात एकूण ३१ समुद्रकिनारे असून, त्यापैकी ११ किनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी होते. त्यामुळे या किनाऱ्यांवर सुरक्षाव्यवस्थेला विशेष प्राधान्य देण्याची आवश्यकता असल्याचे पालकमंत्री गोगावले यांनी सांगितले. संभाव्य धोकादायक ठिकाणांचे सर्वेक्षण करून तेथे पर्यटकांना सावध करणारे स्पष्ट सूचनाफलक लावावेत. पोलिस आणि होमगार्डची गस्त वाढवून समुद्रकिनाऱ्यांवरील हालचालींवर लक्ष ठेवावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
पर्यटकांना योग्य मार्गदर्शन आणि आवश्यक मदत मिळण्यासाठी पर्यटनमित्र नियुक्त करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले. गर्दीच्या ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
आपत्कालीन मदतीसाठी सज्जता
समुद्रकिनाऱ्यांवरील दुर्घटनांच्या वेळी तातडीने बचावकार्य सुरू करता यावे, यासाठी आपदा मित्रांना आवश्यक प्रशिक्षण द्यावे. त्यांना पोहण्याचे प्रशिक्षण देण्यासह बचावकार्यासाठी लागणारी साधनसामग्री उपलब्ध करून द्यावी. संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून बचाव साहित्याच्या उपलब्धतेत कोणतीही कमतरता राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री भरत गोगावले यांनी दिले. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.