दिल्ली बनली आंदोलनांची राजधानी
राहुल गांधींच्या नेतृत्वात विरोधी पक्षांचे प्रचंड शक्तिप्रदर्शन
राहुल गडपाले ः सकाळ वृत्तसेवा
नवी दिल्ली, ता. १२ : देशाची राजधानी दिल्ली सोमवारी दिवसभर विविध राजकीय पक्षांच्या आंदोलनांनी गजबजून गेली. एकीकडे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांनी बाराखंबा रोड परिसरातून मोठी रॅली काढत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली, तर दुसरीकडे भाजपच्या महिला मोर्चानेही राजधानीत आंदोलन केले. त्याच वेळी कॉक्रोच जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने आंदोलनासाठी दिल्ली पोलिसांकडे परवानगी मागितली. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने काही मेट्रो स्थानके आज बंद ठेवली होती तसेच वाहतूक यंत्रणेतदेखील बदल करण्यात आले होते. एकंदरीतच आज दिल्ली आंदोलनांची राजधानी बनली होती. आंदोलक आणि पोलिसांच्या गर्दीने दिल्ली शहराला छावणीचे रूप प्राप्त झाले होते.
दिवसभरातील राजकीय घडामोडींमुळे दिल्लीतील वातावरण तापले. आंदोलनांमुळे विविध भागांत वाहतुकीवर परिणाम झाल्याने सामान्य नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागला. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांनी बाराखंबा रोड परिसरातून प्रचंड मोठी रॅली काढली. या रॅलीच्या माध्यमातून विरोधकांनी आपली भूमिका रस्त्यावर मांडण्याबरोबरच न्यायालयीन लढाईचाही मार्ग स्वीकारला. विरोधकांच्या वतीने राहुल गांधी यांच्या कायदेशीर सल्लागारांनी सर्वोच्च न्यायालयात जाऊन यासंदर्भातील याचिका दाखल केली. दरम्यान, राहुल गांधी, प्रियांका गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, नेहा बोरा, अखिलेश यादव, मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, डी. शिवकुमार, तेजस्वी यादव आदी नेत्यांनी या प्रचंड मोठ्या रॅलीत सहभाग घेतला. बाराखंबा रोडवरून सुरू झालेल्या या रॅलीत देशभरातून आलेले काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, तृणमुल काँग्रेसचे सुगाता रॉय, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि राष्ट्रीय जनता पक्षाचे तेजस्वी यादव यांनी याचिका दाखल केली.
दिल्लीतील काही परिसरात सोमवारीसुद्धा कलम १६३ लागू करण्यात आले होते. मात्र या सरकारी आदेशाला हरताळ फासत विरोधी पक्षांनी प्रचंड मोठ्या रॅलीचे आयोजन केले होते. परिसरात जमावबंदी लागू असल्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात बस भाड्याने घेतल्या होत्या. मात्र, या आंदोलनादरम्यान काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बाराखंबा रोड आणि भगवानदास रोडवर पार्क केलेल्या या बसवर चढून घोषणा द्यायला सुरुवात केली. रॅलीला भगवानदास रोडवर बॅरिकेड टाकून रोखण्यात आले. विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी हे बॅरिकेड भेदण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी त्यांना रोखण्यात यश मिळवले. केंद्रीय सुरक्षा दलाच्या मदतीने बॅरिेकेड ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात येत होते. एका मोठ्या ट्रकवर असलेल्या नेत्यांनी शेवटी पायी चालत सर्वोच्च न्यायालय गाठले. राहुल गांधी आणि यांच्यासोबत मल्लिकार्जुन खर्गे, तेजस्वी यादव, अखिलेश यादव, अभिषेक मनु संघवी आदींनी सर्वोच्च न्यायालय गाठले आणि आपला अर्ज दाखल केला.
...
एसआयआरला आव्हान
राहुल गांधी यांनी भारतीय निवडणूक आयोगाकडून राबविण्यात येत असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला (एसआयआर) सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करून आव्हान दिले आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांकडून या प्रक्रियेविरोधात सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ही याचिका दाखल करण्यात आली. मतदार याद्यांच्या पुनरीक्षण प्रक्रियेत कथित अनियमितता झाल्याचा आरोप करीत विरोधकांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
...
सर्वोच्च न्यायालयात घुसण्याचा प्रयत्न
सर्वोच्च न्यायालयाचे प्रवेशद्वार क्रमांक ३ मधून राहुल गांधी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास सर्वोच्च न्यायालयात दाखल झाले. तत्पूर्वी, काँग्रेसने मुख्य न्या. सूर्य कांत यांना भेटण्याची वेळ मागितली होती; मात्र त्यांनी भेटीस नकार देत याचिका दाखल करण्याची सूचना केली होती. त्यानुसार काँग्रेसने आज आपली याचिका दाखल केली. दरम्यान, राहुल गांधी न्यायालयात गेल्यानंतर अनेकांनी सर्वोच्च न्यायालयात घुसण्याचा प्रयत्न केला. अखेर निमरक्षक दलाच्या जवानांनी आंदोलनकर्त्यांना रोखले.
...
महत्त्वाची घडामोड
राहुल गांधी, प्रियांका गांधी, अखिलेश यादव, तेजस्वी यादव आणि नेहा बोरा हे एकाच ट्रकवर उपस्थित असल्याने विरोधी पक्षांचे राजकीय आंदोलन आणि तरुणांच्या नेतृत्वाखालील आंदोलन यांच्यातील जवळीक अधोरेखित झाली. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड महत्त्वाची मानली जात आहे.
...
काँग्रेसच्या विरोधात मोर्चा
भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या वतीने आज दुपारी काँग्रेसच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. महिलेवर झालेल्या अत्याचाराचा आरोप असलेल्या काँग्रेसच्या खासदारावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा होता.
...
२४ तासांचा अल्टिमेटम
कॉक्रोच जनता पार्टीच्या आशुतोष रांका, सौरव दास यांच्यासह अन्य महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी आज पोलिसांची भेट घेत त्यांना आंदोलन करण्यासाठी परवानगी मागितली. कॉक्रोच जनता पार्टीने त्यांना २४ तासांचा अल्टिमेटम दिला असून, त्यापूर्वी पोलिसांनी प्रतिसाद न दिल्यास आंदोलनाला सामोरे जाण्याचा इशारा रांका यांनी आज येथे बोलताना दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.