फळांच्या भावात १५ ते ५० टक्क्यांपर्यंत वाढ
जागतिक उलथापालथ, दुष्काळाचा फळ बाजाराला फटका
तुर्भे, ता. १३ (बातमीदार) ः जागतिक घडामोडी आणि देशातील विविध भागांत दुष्काळ व प्रतिकूल हवामानामुळे एपीएमसीत फळांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विविध फळांच्या भावात १५ ते ५० टक्क्यांपर्यंत वाढ झाली असून, डाळिंबाच्या किमती जवळपास दुप्पट झाल्या आहेत.
वाशीच्या एपीएमसी फळ बाजारात सध्या सफरचंदांची सर्वाधिक आवक होत आहे. दररोज सुमारे ३५० ते ४०० टन सफरचंद बाजारात दाखल होत असूनही, काश्मीर आणि हिमाचल प्रदेशातील सफरचंदांचे भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे २५ टक्क्यांनी वाढले आहेत. संत्र्यांची दररोज १०० ते ११५ टन, तर मोसंबीची २६० ते २८० टन आवक होत आहे. या दोन्ही फळांच्या भावात सुमारे १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. केळीचे भावही जवळपास ३० टक्क्यांनी वाढले आहेत. डाळिंबाच्या भावात सर्वाधिक वाढ झाली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा डाळिंबाचे भाव जवळपास दुप्पट झाले आहेत. पपईची आवक कमी झाल्याने तिच्याही किमती वाढल्या आहेत.
आयात महागल्याने भाववाढ
फळ व्यापारी यांच्या माहितीनुसार, दक्षिण आफ्रिकेतून सिट्रस वर्गातील फळे, मँडरिन आणि अॅव्होकॅडोची मोठ्या प्रमाणावर आयात होते. न्यूझीलंड आणि वॉशिंग्टन येथून सफरचंदांची आवक सुरू आहे. याशिवाय युरोप आणि ऑस्ट्रेलियातून किवी, चेरी आणि ब्लूबेरी यांसारखी फळे बाजारात येतात. जागतिक स्तरावरील अस्थिरतेमुळे आयात होणाऱ्या फळांच्या पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. सध्या इराणमधून सफरचंदांची आवक होत नसून, तुर्कस्तानातून होणारी आयातही कमी झाली आहे. त्यामुळे परदेशी फळांच्या किमती वाढल्या आहेत.
दुष्काळ आणि प्रतिकूल हवामानाचा परिणाम
काश्मीर आणि हिमाचल प्रदेशातील प्रतिकूल हवामानामुळे सफरचंदांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. महाराष्ट्रातील हवामानातील बदल आणि दुष्काळसदृश परिस्थितीमुळे संत्री, केळी आणि अन्य फळांच्या उत्पादनावरही परिणाम झाला आहे. पपईची आवक कमी असल्याने तिचे भाव वाढले आहेत. पुढील काळात हिमाचल प्रदेशातील पावसामुळे सफरचंदांच्या उत्पादनावर आणि महाराष्ट्रातील पाणीटंचाईमुळे अन्य फळांच्या उत्पादनावर परिणाम झाल्यास बाजारातील आवक आणखी घटण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
फळांचे घाऊक भाव (प्रतिकिलो)
सफरचंद १६०-१८० रुपये
केळी ३०-४० रुपये (डझन)
पेरू ८०-९० रुपये
मोसंबी ५०-६० रुपये
संत्री ५०-६० रुपये
पपई ः ७०-८० रुपये
अननस ः ६०-७० रुपये
डाळिंब ः २००-२२० रुपये
चिकू ः ६०-६५ रुपये
सीताफळ ः ५०-६० रुपये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.