श्री नागदेवी माता
स्मार्ट शहरातही आपले गावपण आणि पारंपरिक संस्कृती जपणारी अनेक प्राचीन देवस्थाने आजही श्रद्धेचे केंद्र बनून आहेत. करावे गावातील नागदेवी मातेचे मंदिर हे त्यापैकीच एक. निसर्गपूजेची परंपरा, आगरी-कोळी समाजाची श्रद्धा आणि आस्था यांचा संगम या मंदिरात पाहायला मिळतो. नागदेवी माता गावाचे संकटांपासून रक्षण करते, अशी ग्रामस्थांची श्रद्धा असून, नागपंचमीला येथे मोठ्या उत्साहात उत्सव साजरा केला जातो.
कोकणच्या लोकसंस्कृतीत निसर्गपूजेला विशेष महत्त्व आहे. नागदेवतेला भूमीचे रक्षणकर्ते मानण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे. शेतीचे आणि धान्याचे उंदरांपासून संरक्षण करणाऱ्या सर्पांविषयी कृतज्ञतेची भावना यामागे असल्याचे मानले जाते. याच परंपरेतून करावे गावात नागदेवी मातेची उपासना सुरू झाल्याचे सांगितले जाते. पूर्वी मंदिराच्या ठिकाणी प्राचीन वटवृक्षाच्या छायेत पाषाणस्वरूपातील देवीची पूजा केली जात होती. कालांतराने लोकवर्गणीतून मंदिराचा जीर्णोद्धार केला असून, आज येथे प्रशस्त मंदिर उभे आहे. मुखमंडप, सभामंडप आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. छतावर साधू आणि गजराजांची शिल्पे असून, मंदिराच्या वास्तुरचनेत धार्मिक आणि कलात्मक वैशिष्ट्यांचा सुंदर मिलाफ दिसतो. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना गणपती आणि हनुमान यांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहावरील त्रिस्तरीय शिखर हे मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. प्रत्येक स्तरावर देवकोष्टके असून त्यांत विविध देवदेवतांच्या मूर्ती आहेत. शिखराच्या शीर्षभागी आमलक आणि सोनेरी कळस आहे. नागपंचमीला मातेचा दुग्धाभिषेक आणि पंचामृत अभिषेक केला जातो. करावे गावासह नवी मुंबईच्या विविध भागांतून भाविक दर्शनासाठी येतात. उत्सवाच्या निमित्ताने देवीची पालखीतून संपूर्ण गावातून मिरवणूक काढली जाते. त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येते. चैत्र आणि आश्विन महिन्यांतील नवरात्रोत्सवही येथे भक्तिभावाने साजरा केला जातो.
अष्टभुजाधारी देवीचे देखणे रूप
गर्भगृहात उंच संगमरवरी चौथऱ्यावर नागदेवी मातेची तांदळा स्वरूपातील पाषाणमूर्ती विराजमान आहे. वस्त्रे, अलंकार, नक्षीदार मुकुट आणि चांदीचे डोळे यांमुळे मूर्तीचे रूप उठून दिसते. मूर्तीवर धातूच्या नागाने छत्र धरलेले आहे. नागदेवी मातेच्या मूर्तीमागे सिंहावर आरूढ झालेल्या अष्टभुजाधारी देवीची आकर्षक मूर्ती आहे. देवीच्या हातांत खड्ग, त्रिशूळ, कमळ, शंख, गदा, बाण आणि धनुष्य ही आयुधे आहेत. एका हातातून देवी आशीर्वाद देत असल्याचे दर्शविण्यात आले आहे. कलात्मक मुकुट आणि विविध अलंकारांनी सजलेली ही मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.