प्रभावती देवी ः तीनशे वर्षांची श्रद्धा
तीनशेहून अधिक वर्षांचा इतिहास लाभलेल्या प्रभादेवी येथील प्रभावती देवीच्या दर्शनाला नवरात्र उत्सवानिमित्त भाविकांची गर्दी होत आहे. प्रभावती देवी अनेक ज्ञाती समाजांची कुलदेवता असल्याने नऊ दिवस देवीची ओटी भरण्यासाठी मंदिरात दूरहून भाविक येतात.
या परिसराला या देवीमुळे प्रभादेवी हे नाव पडले, असे सांगितले जाते. प्रभावती देवीला सुंदर असा साजशृंगार करण्यात आला असून, मंदिर परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघाला आहे.
दर्शनासाठी मंदिर सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत खुले आहे, अशी माहिती मंदिराच्या वतीने देण्यात आली. मंदिरामध्ये कालिका देवी आणि चंडिकादेवी, शक्तीची दोन इतर प्रकटीकरणे प्रभावती देवीच्या दोन्ही बाजूला आहेत. तसेच पाषाणरूपी कालभैरव आहे. मंदिर परिसरात शंकर, गणपती-पार्वती, लक्ष्मी-नारायण, हनुमान, शीतला देवी, खोकला देवी या देवीदेवतांची मंदिरे आहेत.
शंकराच्या मंदिरासमोर पूर्वी असलेली नंदीची मूर्ती एल्फिन्स्टन कॉलेजसमोरील संग्रहालयात ठेवण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांत मुंबईत झपाट्याने बदल झाले; मात्र प्रभादेवीतील हे मंदिर आजही आपली संस्कृती आणी परंपरा कायम टिकवून आहे.
जानेवारी महिन्यात शाकंभरी पौर्णिमेला इथे जत्रा भरते. पौष पौर्णिमा ते दहा दिवस देवीचा वार्षिक उत्सव असतो. सुरुवातीला तीन दिवस असणारा उत्सव काळानुरूप पाच दिवस आणि नंतर दहा दिवस करण्यात आला. या दिवसांत मंदिराच्या समोरील अंगणात वाळूमध्ये मेथी लावली जाते.
मंदिराच्या आग्नेय दिशेला असलेला दीपस्तंभ १८५० साली बांधण्यात आला असून, ईशान्य दिशेकडील दीपस्तंभ हा १९६२ साली बांधण्यात आला आहे. आजही ३०० हून अधिक वर्षे जुना असलेला मंदिरातील शिलालेख मंदिराच्या इतिहासाची साक्ष देतो.
अलर्क देसाई, अनुराग तळपदे हे मंदिर ट्रस्टचे विश्वस्त म्हणून या मंदिराचा कार्यभार पाहात असल्याची माहिती मंदिराचे मुख्य पुजारी सुयोग जोगळेकर यांनी दिली.
आख्यायिका
प्रभादेवी मंदिर हे मुंबईतील पुरातन मंदिरांपैकी एक प्रमुख मंदिर आहे. हे मंदिर ३१० वर्षे पुरातन असून, मंदिरातील प्रभावती देवीची मूर्ती ही मंदिरासमोरील विहिरीत होती. श्रीमंत पठारे प्रभू समुदायातील श्याम नायक यांना देवीने दृष्टांत दिला. त्यानंतर श्याम नायक यांनी देवीची मूर्ती विहिरीतून बाहेर काढून मंदिर १७१५ साली बांधले. देवस्थानची जागा मंदिर ते समुद्रकिनारा तसेच समोरील रोडच्या पलीकडे होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.