आईच्या चरणी एकच साकडं; कळंबोली-पनवेल होऊ दे ‘नशामुक्त’
नवरात्रोत्सवात नशामुक्तीचा जागर; गुटखा आणि अमली पदार्थांपासून तरुणाईला वाचविण्यासाठी जनजागृती
कळंबोली, ता. १३ (बातमीदार) ः नवरात्रोत्सवाच्या भक्तिमय वातावरणात देवीच्या चरणी नतमस्तक होत कळंबोली आणि पनवेल परिसर पूर्णपणे नशामुक्त करण्याचा संकल्प शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे. आजच्या तरुणाईला गुटखा आणि घातक अमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी यंदाच्या नवरात्रोत्सवात विशेष नशामुक्तीचा जागर घालण्यात येत आहे. धार्मिक उत्सवाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचा एक आदर्श संदेश देणारा हा उपक्रम शिवसेनेने हाती घेतला आहे.
‘आईच्या चरणी एकच साकडं, कळंबोली-पनवेल होऊ दे नशामुक्त! जगदंबेच्या चरणी आज एकच मागणं, गुटखा-अमली पदार्थांपासून तरुणाईला वाचवणं!’ या संदेशातून तरुण पिढीला व्यसनांपासून दूर ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक रामदास शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कळंबोली परिसरात नशामुक्तीची चळवळ बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नवरात्रोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजहिताचा संदेश देणारे व्यासपीठ ठरावे, या उद्देशाने जनजागृतीवर भर दिला जात आहे. तरुणांनी व्यसनांपासून दूर राहून शिक्षण, क्रीडा आणि विधायक उपक्रमांकडे वळावे, हा या अभियानामागील प्रमुख हेतू आहे. कळंबोली येथील महिषासुरमर्दिनी देवीचा नवरात्रोत्सव धार्मिक शिस्त आणि भक्तिभावासाठी ओळखला जातो. या उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत नशामुक्त समाजनिर्मितीचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
कळंबोली शिवसेना शहरप्रमुख तुकाराम सरक, युवा नेतृत्व तन्मय शेवाळे आणि शिवसेना विभागप्रमुख नीलेश दिसले यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे या उपक्रमाला सहकार्य लाभत आहे. देवीच्या आशीर्वादाने तरुणाईचे भविष्य सुरक्षित व्हावे आणि कळंबोली-पनवेल परिसर व्यसनमुक्त व्हावा, असा संकल्प या नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.