घाटकोपरमध्ये रामभक्तीचा जागर
माणिकलाल मैदानात भव्य रामलीला; आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
घाटकोपर, ता. १४ (बातमीदार) : घाटकोपर पश्चिमेतील माणिकलाल मैदानात श्री रामलीला महोत्सवाच्या निमित्ताने रामभक्तीचा जागर सुरू आहे. श्री रामलीला महोत्सव समितीच्या वतीने आयोजित या महोत्सवाने यंदा ६३व्या वर्षात पदार्पण केले आहे. सहा दशकांहून अधिक काळाची धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जपणाऱ्या या महोत्सवाला यंदा आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे. भव्य मंडप, आकर्षक रंगमंच, एलईडी स्क्रीन आणि प्रोजेक्टरच्या माध्यमातून रामायणातील विविध प्रसंगांचे प्रभावी सादरीकरण केले जात आहे. भाविकांच्या सोयीसाठी मैदानात पाच हजारांहून अधिक खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
रामायणातील प्रसंग अधिक जिवंत करण्यासाठी एलईडी स्क्रीन, प्रोजेक्टर आणि अत्याधुनिक तांत्रिक साधनांचा वापर केला जात आहे. तसेच फेसबुकसह अन्य डिजिटल माध्यमांतून रामलीलेचा प्रसार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यंदा रामलीलेचे आयोजन अधिक व्यापक आणि भव्य स्वरूपात करण्यात आले आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष सुनील दुबे यांनी दिली. सादरीकरण अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न आहे, असे ट्रस्ट बोर्डाचे अध्यक्ष अशोक दुबे यांनी सांगितले. धार्मिक परंपरा जपतानाच ती नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यावर भर असल्याचे संरक्षक मंडळाचे अध्यक्ष रामसूरत पांडे यांनी सांगितले.
ताडका वध, अहिल्या उद्धाराने वेधले लक्ष
रामलीलेत ताडका वध, अहिल्या उद्धार, गंगावतरण आणि जनकपूर दर्शन यांसारख्या महत्त्वपूर्ण प्रसंगांचे सादरीकरण करण्यात आले. भगवान श्रीराम यांच्या पराक्रमाचे दर्शन घडविणाऱ्या ताडका वधाच्या प्रसंगाला प्रेक्षकांची दाद मिळाली, तर अहिल्या उद्धाराच्या प्रसंगातून श्रीराम यांची करुणा आणि दयाभाव प्रभावीपणे मांडण्यात आला. चित्रकूट धाम येथील ॐ तत्त्वज्ञान रामायण प्रचारक रामलीला मंडळाच्या माध्यमातून हा महोत्सव सादर केला जात आहे. मंडळाचे संचालक व व्यवस्थापक पंडित पवन शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली रामलीलेचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.