विद्याविहार कनेक्टरला कोणाचे नाव?
कॅप्टन स्मित मच्छार, प्रमोद महाजन, नाना पाटेकर यांच्या नावांसाठी मागणी
घाटकोपर, ता. १४ (बातमीदार) ः मुंबई महापालिकेने नव्याने उभारलेल्या विद्याविहार पूर्व-पश्चिम कनेक्टरच्या उद्घाटनापूर्वीच त्याच्या नामकरणावरून घाटकोपरमधील राजकीय वातावरण तापले आहे. या उड्डाणपुलासाठी भाजपच्या दोन नेत्यांकडून वेगवेगळी नावे सुचविण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे, तर शिवसेना ठाकरे गटाकडून दिवगंत अभिनेते नाना पाटेकर यांचे नाव सुचवण्यात आले आहे.
घाटकोपर पूर्वचे भाजप आमदार पराग शाह यांनी मुंबई महापालिका आयुक्तांकडे विद्याविहार पूर्व-पश्चिम कनेक्टरला ‘कॅप्टन स्मित मच्छार उड्डाणपूल’ असे नाव देण्याची मागणी केली आहे. घाटकोपरचे सुपुत्र असलेल्या कॅप्टन स्मित मच्छार यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत धैर्य, प्रसंगावधान आणि कर्तव्यनिष्ठेचे दर्शन घडवत १७० हून अधिक प्रवाशांचे प्राण वाचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती, असे शाह यांनी नमूद केले आहे. त्यांच्या शौर्याचा आणि मानवतावादी दृष्टिकोनाचा सन्मान म्हणून या उड्डाणपुलाला त्यांचे नाव देण्यात यावे, अशी भूमिका आमदार पराग शाह यांनी मांडली आहे.
विद्याविहार पूर्व आणि पश्चिम या दोन्ही भागांना जोडणारा हा कनेक्टर लवकरच नागरिकांच्या सेवेत दाखल होण्याची अपेक्षा आहे, मात्र उद्घाटनापूर्वीच नामकरणासाठी तीन वेगवेगळ्या मागण्या पुढे आल्याने कोणत्या नावाला प्राधान्य मिळणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे घाटकोपरमधील भाजपच्या राजकीय वर्तुळात या नामकरणाच्या मुद्द्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
प्रमोद महाजन यांच्या नावासाठी प्रकाश मेहता यांची मागणी
दुसरीकडे, महाराष्ट्राचे माजी गृहनिर्माण मंत्री आणि घाटकोपरचे माजी आमदार प्रकाश महेता यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विद्याविहार पूर्व-पश्चिम उड्डाणपुलाला स्वर्गीय प्रमोद महाजन यांचे नाव देण्याची मागणी केली होती. घाटकोपरसह मुंबईच्या विकासात प्रमोद महाजन यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले असून, या महत्त्वाच्या उड्डाणपुलाला त्यांचे नाव देणे उचित ठरेल, अशी भूमिका प्रकाश महेता यांनी मांडली आहे.
अभिनेते नाना पाटेकर यांच्या नावाची शिफारस
शिवसेना ठाकरे गटाने दिवगंत अभिनेते आणि समाजसेवक नाना पाटेकर यांचे नाव देण्याची शिफारस केली आहे. नाना पाटेकर यांनी अभिनयासोबतच सामाजिक कार्यातदेखील नेहमीच हिरिरीने भाग घेतला आहे. अभिनेते मकरंद अनासपुरे या दोघांनी मिळून सुरू केलेल्या नाम फाउंडेशनद्वारे अनेक लोकोपयोगी कामे केली आहेत. अशा थोर माणसाचे नाव उड्डाणपुलास दिल्यास त्यांचा खरा अर्थाने गौरव होईल, अशी सूचना शिवसेना उबाठाचे प्रकाश वाणी यांच्याकडून करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.